अस्थिव्यंग मयूरला मदतीचा हात!

0

वाकड : येथील राष्ट्रवादीचे युवानेते व उद्योजक विशाल वाकडकर यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र, हिंजवडी येथील अस्थिव्यंग विद्यार्थी मयूर वाडकर याचे पालकत्व स्वीकारले. त्याच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी वाकडकर उचलणार आहेत. त्यामुळे वाडकर याचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

वाकडकरांचा निस्वार्थ हेतू
मयूर हा भोर तालुक्यातील ससेवाडीचा रहिवासी आहे. त्याला 80 टक्के अपंगत्व असून, त्याच्या घरची परिस्थितीही बेताची आहे. उच्च शिक्षण घेऊन चांगले करिअर करण्याची त्याची इच्छा आहे. परंतु, घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्याला अडचणी येत होत्या. हीच बाब हेरून वाकडकर यांनी त्याचे पालकत्व स्वीकारून त्याच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे मयूरचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, समाजाचे आपण काही देणं लागतो, याच भावनेतून मी मयूरचे पालकत्व स्वीकारले आहे. दरवर्षी निराधार व गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्याचा माझा मानस आहे, असे वाकडकर यांनी सांगितले.