ज्या काळात अंधश्रद्धा, अज्ञान, दारिद्रय, परंपरा, जात यामुळे विविध समस्यांच्या गर्तेत दलितवर्ग सापडला होता. ग्रामीण दलित माणसांच्या वेदनांना वाचा फोडण्याचे कोणतेच साधन नव्हते, त्या काळात डॉ. गंगाधर पानतावणे यांची अस्मितादर्श चळवळ या उपेक्षित आणि पीडितांच्या वेदनांना शब्दांचे रूप देऊन एल्गार पुकारत होती. दलित संघर्षाचे विविध पदर अलगदपणे उलगडणारे डॉ. पानतावणे यांचे साहित्य खरे तर दलित व बहुजनांच्या इतिहासाची रेखाटलेली पाने आहेत, त्यातून त्यांनी ध्येयवाद पेरला, आंबेडकरी विचार दिला आणि अन्यायाला वाचाही फोडली. एक मोठी पिढी घडवण्याचे काम पद्मश्री पानतावणे यांनी केले. अस्पृश्यतेच्या दाहकतेचे चटके त्यांनी स्वतः सोसलेले असल्याने त्यांच्या शब्दांत वेदना होती. परंतु, अलीकडच्या दलित साहित्याप्रमाणे नक्षली अंगार नव्हता. त्यांच्या साहित्यातून त्यांनी व्यवस्थेवर प्रहार केले, परिवर्तनाचे विचार दिले, त्यामुळे दलित व बहुजनांच्या जीवनात आणि विचारात परिवर्तन होऊ शकले. त्यांच्या निर्वाणाने एक धगधगता यज्ञकुंड थंडावला आहे.
पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व अस्मितादर्श चळवळीचे जनक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निर्वाण झाले आहे. त्यांच्या निर्वाणाने बहुजन साहित्यातील दिग्गज लेखक, विचारवंत हरपला आहे. दलित साहित्य आणि दलित चळवळीत त्यांनी दिलेले बहुमोलाचे योगदान विसरता येणे शक्य नाही. त्यांच्या साहित्यातून वेदना प्रकट झाल्यात. तथापि, निरर्थक आक्रोशाने रक्तरंजित, बटबटीतपणा केला नाही. हृदयाला दलित व दलितेतर बहुजनांच्या वेदना टोचतील, असे साहित्य त्यांनी प्रसवले. लोकसाहित्य, कविता, नाटके, समीक्षा आणि संशोधनपर लिखाण या साहित्याच्या सर्वच क्षेत्रात अधिकारवाणीने त्यांनी भ्रमंती केली. नवलेखकांच्या पिढ्याच्या पिढ्या घडवल्या. औरंगाबादेतील नागसेन वनातील त्यांचे घर म्हणजे नवलेखक घडवणारे विद्यापीठच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ध्येयवाद त्यांनी नवपिढीला शिकवला, त्यांच्या साहित्य आणि विचारातूनही याच ध्येयवादाची पेरणी झाली. अलीकडच्या काळात दलित-बहुजनातील जी ध्येयवादी पिढी समाजाच्या विविध क्षेत्रांत काम करताना दिसते, त्याचे मूळ डॉ. पानतावणे यांच्याच मूळ ध्येयवादी विचारात आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांशी अखेरपर्यंत त्यांची नाळ जुळलेली होती. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारपीठावरदेखील त्यांची मुशाफिरी दिसून आली आणि दलित आणि खास करून बहुजनांमधील एका वर्गाला ती कायमच खटकत राहिली. त्यामुळेच दलित असो किंवा बहुजन असो या वर्गातील एक घटक त्यांना वैचारिक अस्पृश्यच समजत होता. संघाशी सलगीचा विषय सोडला तर डॉ. पानतावणे यांच्या कार्याबद्दल आंबेडकरी चळवळ नेहमीच कृतज्ञ राहील.
अस्मितादर्श चळवळीने महाराष्ट्रात साहित्यिक व लेखकाची मोठी पिढी घडवली आहे. मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी दलित जेव्हा संघर्ष करत होते, त्याकाळात अस्मितादर्शने त्यांना तेजस्वी विचार दिले. दलित साहित्याने अंधार नाकारून कलंकित भूतकाळ पुसून काढला, त्याचे खरे श्रेय डॉ. पानतावणे यांना द्यावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानातून जे तेजस्वी विचार बाहेर पडलेत, त्याच विचारातून दलित साहित्याने भरारी घेतली. साहित्य, संस्कृती, धर्म, इतिहास, मानववंशशास्त्र या सर्वच क्षेत्राची चिकित्सा सुरू झाली, त्या काळात अस्मितादर्श या नियतकालिकाने नवसाहित्यिकांना हक्काचे विचारपीठ उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे विविध प्रकारची चिकित्सा चळवळीसाठी ऊर्जास्रोत बनून गेली.
ललित साहित्यापासून व्यक्तिगत लेखन सुरू केलेल्या डॉ. पानतावणे यांनी लोकसाहित्यासह सर्वच अभ्यासविषय मोठ्या ताकदीने हाताळले. त्यांनी उभारलेली साहित्य चळवळ केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अखिल भारतीय पातळीवर गौरवाने ओळखली गेली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दलित साहित्य अकादमी पुरस्कार, फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाची गौरववृत्ती आदीसह अलीकडेच सर्वोच्च अशा पद्मश्री पुरस्काराने केंद्र सरकारच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. अमेरिकेत झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना भूषवण्याचा सन्मान मिळाला. वैचारिक लिखाणाबरोबरच समीक्षेच्या प्रांतात असलेला त्यांचा वावर हा खरा तर वाखाणण्याजोगा होता. धम्मचर्चा, मूल्यवेध, मूकनायक, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाङ्मय, किल्ले पन्हाळा ते विशालगड, साहित्य प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी मांडलेले समीक्षणात्मक विचार भावी पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहतील.
डॉ. पानतावणे यांच्याकडे आंबेडकरी ध्येयवाद होता, साहित्य म्हणजे काय व त्याची ताकद याची जाणीव त्यांना होती. त्यांचे वाचनही चौफेर होते. धर्म-जाती-देश निरपेक्ष अशा साहित्यिक भूमिकेवरच ते कायम प्रेम करत राहिले. 1937च्या दशकात नागपुरात जन्मलेले डॉ. पानतावणे हे वैदर्भीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली आणि तेथेच ते मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित मिलिंद महाविद्यालयातही अध्यापनाचे काम केले. त्यांनी केवळ विद्यार्थीच घडवले नाही तर प्रबुद्ध भारत घडवण्याचेही महत्त्वपूर्ण काम केले. दलित साहित्य हा नेहमीच त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला. फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार आणि साहित्य तळागाळात पोहोचवण्यासाठी आपली तहयात खर्च केली. साहित्याच्या माध्यमातून दुर्बल अन् उपेक्षितांच्या वेदनांना वाचा फोडण्याचे काम करणारे पद्मश्री डॉ. पानतावणे हे आता निर्वतले आहेत, त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळ खरोखर पोरकी झाली याचे दुःख मोठे आहे. साहित्यातील त्यांचे भरीव योगदान, हे राष्ट्र कदापि विसरणे शक्य नाही.