अस्वच्छता केल्यास जागेवर दंड

0

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत वरणगाव पालिकेने कसली कंबर ; पंधरा दिवसात दोन हजारांचा दंड वसुल

वरणगाव– शहरातील स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत व्यावसायीकांनी अथवा वैयक्तीक जागेवर घाण केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यास पालिका कर्मचार्‍याकडून सुरूवात केली आहे. या अंतर्गत पालिकेने 15 दिवसात दोन हजार रुपयाची दंडात्मक कार्यवाही करून वसुलीदेखील केली आहे. शहराने स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. त्या दृष्टीकोनातून शहर स्वच्छ करण्यामध्ये पालिकेचे कर्मचारी व्यस्त आहेत.

15 दिवसात दोन हजार दंड
गेल्या काही दिवसापासून या अंतर्गत जनजागृती देखील केली जात आहे. मात्र काही व्यावसायीक आपल्या दुकानाच्या अथवा हॉटेलच्या आजुबाजुला अस्वच्छता करत असतील अथवा नागरीक शौच अथवा लघूशंका उघड्यावर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाहीचे सत्र गेल्या 15 दिवसापासून पालिकेने सुरू केले आहे. यामुळे पालिकेकडे दोन हजाराचा दंड वसुल झाला आहे.

कर्मचार्‍यांचा होणार सन्मान
गेल्या काही दिवसापासून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस कामाला लागले आहे. यामुळे शहराची एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. यामधे ज्या प्रमाणे नागरीकांचा मोलाचे सहकार्य आहे तसेच कर्मचार्‍यांचेदेखील आहे. या कर्मचार्‍यांचा सन्मान नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शे युसुफ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगरसेवकांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. यामुळे कर्मचार्‍यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

कॅरीबॅगचा आग्रह सोडा
शहराला स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत एक ओळख निर्माण होणार आहे. यामुळे शहरातील घाण नाहिशी होवून आरोग्यदायी परिस्थिती निर्माण होत आहे. यासाठी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कर्मचारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्यांना मदत म्हणून बाजारात अथवा दुकानात गेल्यानंतर नागरीकांनी कॅरीबॅगचा आग्रह सोडून घरूनच जाताना कापडी पिशव्यांचा वापर करा.