अस्वच्छतेबाबत पंतप्रधानांना पत्र

0

वाडी । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यानंतर स्वच्छ भारत अभियान उपक्रम प्राधान्याने राबवित आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहे. प्रशासनाला प्रत्येक नागरिकांकडून सहकार्य अपेक्षीत आहे. मात्र शिरपूर तालुक्यातील वाडी बु. येथील दलित वस्तीत गेल्या 25 वर्षापासून पोलीस पाटील पदावर कार्यरत असलेल्या जबाबदार नागरिकाने उकीरडा करुन ठेवला आहे. उकीरड्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करुन देखील दखल घेतली जात नसल्याने संतप्त सुजाण नागरिकांनी थेट पंतप्रधान यांना छायाचित्रासह पत्राद्वारे अस्वच्छतेबाबतची हकीकत कळविली आहे.

समस्यांबाबत दिली अनेकवेळा तक्रार
समस्येबाबत जागरूक नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासन, तंटामुक्ती समिती, पंचायत समिती, पोलीस स्टेशन यांना तोंडी, लेखी निवेदन सादर केले आहेत. मात्र पोलीस पाटील यांच्या दबावाला प्रशासनही बळी पडले असल्याचे बोलले जात आहे. वर्षानूवर्षे पडून असलेल्या उकीरड्यामुळे मोकाट कुत्रे, डुकरे येऊन बसत असतात. त्यामुळे सभोवतालचे वातावरण दूषित होत असून नागरिकांना आरोग्याचा प्रश्‍न उद्भवला आहे.राज्यात डेंगू, मलेरिया, चिकून गुणिया सारख्या साथिच्या आजाराचे दररोज बळी जात असतांनाही प्रशासनाला स्वच्छतेचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. एकीकडे स्वच्छ भारतासाठी मोदी सरकारने विविध उपक्रम राबवले जात आहेत. तर दुसरीकडे शासनाच्या अखत्यारीतले जबाबदार व्यक्तिकडून सामाजिक स्वास्थ बिघडविण्याचे कृत होत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

वस्तीच्या मधोमध अस्वच्छता
दलित वस्तीत राहणारे व गावाच्या न्याय निवड्याचे काम पाहणारे पोलीस पाटील नाना निकुंभे यांनी आपल्या राहत्या घरासमोर 25 वर्षांपासून उकीरडा करून ठेवला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान पावसाळ्यात डांसाची उत्पत्तीमुळे रोगराई पसरते. दीडशेहुन अधिक लोकसंख्या असलेल्या वस्तीच्या मधोमध हा उकीरडा असल्याने सर्वच नागरिकांना याचा त्रास आहे.

सदर उकिरडा माझ्या घराला लागूनच असल्याने अनेक वर्षापासून त्रास सहन करीत आहोत. पावसाळ्यात तर खुप घाण होते. पावसाळ्यात अक्षरशःउकीरड्यातील किडे आमच्या घरात शिरतात. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. प्रशासन दखल घेत नाही, तरी प्रशासनाने उकीरडा उचलण्याची कार्यवाही तात्काळ करावी.
-जितेंद्र निकुंभे

या उकीरड्यामुळे आमच्या खिडकीतून दुर्गंधी घरात येते. किती तरी वर्षापासून आम्ही हा त्रास सहन करत आहेत. संबंधीताला उकीरडा उचलण्यासाठी विनंती केल्यास ते वरून शिवीगाळ व दमदाटी करतात. उकीरड्यामुळे आरोग्याला धोका आहे.
-आरती थोरात