अस्वच्छतेमुळे अंजनी नदीला आले गटारीचे स्वरूप

0

एरंडोल । एकेकाळी एरंडोल शहरातून बारमाही खळखळ वाहणारी शहराचे आकर्षण व सौदर्यात भर टाकणारी व शहराची जलजीवन वाहिनी समजली जाणारी तसेच पांडवाच्या पद्स्पर्शाने पावन झालेली व ऐतिहासिक वारसा लाभलेली अंजनी नदीला सध्या घाणीमुळे गटारीचे बकाल स्वरूप प्राप्त झाले असून त्यामुळे नदी घाणीच्या साम्राज्यात लुप्त झाली काय? असा सवाल पर्यावरण प्रेमी व सुज्ञ नागरिक करीत आहेत. शहराच्या माध्यवर्ती भागातून वाहणारी अंजनी नदीमुळे शहराचे दोन भाग झालेले असून नदी पात्र मध्यवर्ती भागामध्ये आहे. त्यामुळे नदीवर पूल, पादचारी फर्ची या मार्गावरूनच नागरिकांचा वापर असल्यामुळे नदी पात्रातील केर, कचरा घाण, काटेरी झुडपे व दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे नदीपात्रा जवळील परिसरात दुर्गधीमुळे डास, मच्छर अति वाढल्याने साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत.

एकीकडे राज्यशासन व केंद्रशासन गावोगावी स्वच्छता मोहीम राबवत असतांना मात्र एरंडोल नगरपालिका या सर्व प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. तरी या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित करून नदी पत्रातील वाढलेली काटेरी झुडपे तोडण्यात यावी व दुर्गंधीयुक्त जमा झालेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी जेणेकरून पादचारी व परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा विचार करावा अशी मागणी होत आहे. गत पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत सर्वच प्रतीस्पर्धींनी एरंडोल शहर, परिसर व अंजनी नदीपात्र स्वच्छ व त्याला चौपाटीचे स्वरूप देऊन सौदर्यकरण करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र निवडणूक संपली व अश्‍वासन हवेतच विरले आहे.