फुरसुंगी : हडपसर-सासवड पालखी मार्गावरील ऐतिहासिक व हिरवाईने नटलेल्या दिवे घाटात जागोजागी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या परिसरात अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरली आहे. परिणामी घाटाच्या सौंदर्याला बाधा निर्माण होत आहे.
दिवे घाटाच्या विविध टप्प्यावर सडलेल्या भाज्या, कचरा, लग्नसभारंभातील टाकाऊ पदार्थ, देखावे, प्लॅस्टिक कचरा, हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ सर्रासपणे आणून टाकले जातात. कठडे तुटलेल्या भागात वाहनातून हा कचरा आणून टाकला जातो. तसेच मेलेली जनावरे, पोल्ट्रीतील टाकाऊ पदार्थ, वैद्यकीय टाकाऊ साहित्य याठिकाणी फेकून दिले जाते. त्यामुळे या निसर्गरम्य व ऐतिहासिक घाटात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधीचे साम्राज्यही तयार होत आहे. त्यामुळे याठिकाणांंहून प्रवास करणार्या प्रवाशांना नाक मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
कठडे तुटल्याने अपघाताचा धोका
अनेकवेळा याठिकाणी हा कचरा पेटविण्याचेही प्रकार पाहावयास मिळतात. या दिवे घाटांतून दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते. तसेच पावसाळ्यात दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी फिरावयास येतात. राज्य महामार्ग असल्याने या मार्गे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. काही ठिकाणी घाटाचे कठडे तुटले आहेत, काही ठिकाणी ते तुटण्याच्या मार्गावर आहेत. याठिकाणी अनेक तरुण-तरुणी सेल्फी काढताना दिसतात, मात्र या धोकादायक कठड्यांमुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहेत
कारवाईची मागणी
या ऐतिहासिक घाटाच्या दुरुस्तीबरोबरच येथे कचरा टाकून विद्रुपीकरण करणार्यांवर सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत कडक कारवाई करण्यात यावी. याठिकाणी कचरा टाकण्यास बंदी असल्याबाबतचे फलक लावण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शादाब मुलानी, ज्ञानेश्वर कामठे, रुपेश बोबडे, मयुरेश जाधव यांनी केली आहे.