शहादा । शहरातील मध्यवर्ती भागात अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगांची लागण होत असून तुपबाजार व परिसरातील बालकांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बालकांवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असून या घटनेने शहरवासियात खळबळ उडाली आहे. परिसरातील युवकांनी पालिका कार्यालयात जावून संबंधीत अधिकार्यांची भेट घेतली असून परिसर स्वच्छतेची मागणी केली आहे. शहरातील तुप बाजार, क्रांती चौक, तांबोळी गल्ली, मारवाडी गल्ली, भोई गल्ली, विठ्ठल मंदिर, खोल गल्ली आदि भागातील सांडपाणी वाहून नेणार्या गटारी तुबंल्या असून परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.
पालिका प्रशासनातर्फे दुर्लक्षाचा आरोप
पालिका आरोग्य विभागाकडे वारंवार मागणी करुनही स्वच्छतेची कार्यवाही होत नसल्याने डास, मच्छर यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. गत सुमारे 15 दिवसांपासून या भागातील बालके हिवताप, सर्दी, खोकला आदि ंनी त्रस्त झाली आहेत. काही बालकांना खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले असून रोहित गौरीशंकर बोरसे (9 वर्ष), चेतन सुरेश पाटील (5 वर्षे), साई विनोद गुरव (8 वर्ष), प्राची भावसार (16 वर्ष), जाणवी मनोज गुरव (7 वर्ष), आदित्य जैन (8 वर्षे) यांना डेंग्यूसदृष्य आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या बालकांवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बालकांना साथीच्या आजारांची लागण होत आहे.