मनपा महासभेत अस्वच्छतेवरून गदारोळ; अधिकाऱ्यांवर ओढले ताशेरे
जळगाव: शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेचा ठेका महानगरपालिकेने वॉटर ग्रेस या कंपनीला दिले आहे. कंपनीने कामाला सुरुवात करून आज तीन महिने पूर्ण झाले आहे. मात्र शहरातील एकही वॉर्ड स्वच्छ नसून परिस्थिती पूर्वीप्रमाणेच अस्वच्छ असल्याची तक्रार करत सर्वपक्षीय नगरसेवक आणि मनपा प्रशासनाने वॉटर ग्रेस कंपनीच्या कामावर नाराजी व्यक्त केली. शहरातील ७५ नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक वॉटर ग्रेस कंपनीच्या कामावर समाधानी नसून हा ठेका रद्द करण्यात येऊन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत केले. शुक्रवारी महापालिकेची महासभा महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आयुक्त डॉ.उदय टेकाळे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.
पावणे दोन कोटींचा दंड
कंपनीची यंत्रणा १०० टक्के अपयशी ठरल्याचे सांगत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर मलिदा लाटल्याचा आरोप केला. अधिकाऱ्यांमुळे कंपनी समाधानकारक काम करत नसल्याने नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र कामात सुधारणा करण्याची वारंवार सूचना करून देखील सुधारणा होत नसल्याने प्रशासनही कंपनीच्या कामामुळे त्रस्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कंपनीच्या कामातील त्रुटींमुळे आजपर्यंत कंपनीला तब्बल पावणे दोन कोटींपर्यंत दंड आकारण्यात आला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात दंड झाल्यानंतर देखील कंपनीच्या कामात सुधारणा दिसत नसल्याचे ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी नगरसेवकांनी केली. दरम्यान कंपनीच्या प्रतिनिधीला कामात सुधारणा करण्यासाठी एका महिन्याची मुदत देत सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिला.
नगरसेवकांच्या रिपोर्टनंतर बिले द्यावी
वॉटर ग्रेस कंपनीच्या स्वच्छतेच्या कामावर एकही नगरसेवक समाधानी नाही. प्रशासनाने नगरसेवक डायरीची व्यवस्था करावी, त्या डायरीत नगरसेवक समाधानी असल्याचे रिपोर्ट नोंदवावे. या रिपोर्टनंतरच ठेकेदाराला बिल अदा करण्यात यावे अशी सूचना स्थायी समिती सभापती शुचिता हाडा यांनी केली. कंपनीने तीन महिन्यानंतरही सफाई कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, गणवेश देण्यात आलेले नाही. सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नसल्याची तक्रारही करण्यात आली.
आरोग्याधिकाऱ्यावर पैसे घेतल्याचे आरोप
वॉटर ग्रेस कंपनीच्या कामात अधिकाऱ्यांच्या चिरीमिरीमुळे सुधारणा होत नसल्याचे आरोप झाले. आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी कंपनीच्या एका प्रतिनिधीकडून पाच लाख रुपये घेतल्याचे आरोप देखील महासभेत आरोग्य सभापती चेतन संकत आणि नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले. बिल काढण्यासाठी पैसे घेतल्याचे हे आरोप होते. मात्र यावेळी आरोग्य अधिकारी उदय पाटील सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे आरोपाबाबत खुलासा होऊ शकला नाही.
सेना-भाजपच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी
एका सफाई कर्मचाऱ्यावरील बडतर्फची कारवाई रद्द करण्याची मागणी स्थायी सभापती शुचिता हाडा आणि नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केली. यावर सेनेचे नगरसेवक इबा पटेल यांनी कारवाई रोखण्यासाठी नगरसेवकांनी पैसे घेतले असेल असे वक्तव्य केले. यावरून भाजप-सेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. तसेच नगरसेवक नितीन बरडे यांनी भाजपच्या ८ नगरसेवकांवर ठेकेदारीचे आरोप केले होते. यावर भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत, बरडे यांनी ‘त्या’ नगरसेवकांचे नाव जाहीर करावे अन्यथा माफी मागावी अशी मागणी केली. नाव माहित नसल्यानेच बरडे हे सभागृहातून पाळले असे आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केल्याने सभागृहात खडाजंगी झाली.