केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने स्वच्छ शहराच्या जाहीर केलेल्या यादीत ठाणे शहराचा क्रमांक 17 व्या स्थानावरून थेट 116 व्या स्थानावर घसरला आहे. शहरातील स्वच्छतेवर ठाणे महानगरपालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र, तरीही ठाण्यातील अस्वच्छता यानिमित्ताने पुढे आली आहे. स्वच्छता अभियानांतर्गत खुद्द ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. स्वच्छ शहराच्या यादीत ठाण्याचे नाव गडगडल्यानंतर नेहमीप्रमाणे सत्ताधार्यांनी त्यांचे खापर प्रशासनावर फोडून आपली जबाबदारी झटकली आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी यासाठी सत्ताधार्यांना जबाबदार धरत कोट्यवधी रुपयांचा खर्च जातो कुठे, असा सवाल उपस्थित केला आहे. एकंदरीत ‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे’ ही प्रतिमा आता ‘अस्वच्छ ठाणे’ होण्याची भीती निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाच्या महास्वच्छता अभियानामध्ये ठाणे महानगरपालिका प्रशासनाने सहभाग घेतला होता. या अभियानासाठी कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण, तो वाहून नेणे, त्याची विल्हेवाट, त्याबाबत नागरिकांत जागृती, पुरेशी स्वच्छतागृहे असणे आणि स्वच्छ सार्वजनिक शौचालये असे निकष यासाठी होते. मात्र, निकषाची पूर्तता न केल्यामुळेच ठाणे शहराचा क्रमांक 17 व्या स्थानावरून आता थेट 116 व्या स्थानावर गडगडला आहे. ठाणे शहरात दररोज सुमारे 800 मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आजवर खाडी किनारे, सरकारी जमिनी, खासगी भूखंड व्यापले आहेत. त्यामुळे आता कचरा टाकण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. परिणामी, ठाण्यातील कचराकोंडी अजूनही कायम आहे.
ठाणे शहरातल्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने डायघर येथील 18.89 हेक्टर इतकी जागा चार वर्षांपूर्वी तब्बल 18 कोटी रुपये मोजून आपल्या ताब्यात घेतली. कचर्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे काम हेंजर बायोटेक या कंपनीला देण्यात आले. हा प्रकल्प मार्गी लागला असता तर ठाणे शहरातील कचर्याचा जाच कायमचा सुटला असता. मात्र, पालिका प्रशासनाची अनास्था, स्थानिक लोकांचा विरोध, राजकीय हस्तक्षेप आणि लालफितीच्या कारभारामुळे डम्पिंग ग्राऊंडच्या उभारणीत अनेक विघ्न निर्माण झाली. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास येऊ शकला नाही. त्यामुळे आजही ठाण्यातील कचर्यांचा प्रश्न कायम आहे.
ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले. ठाणे शहराची लोकसंख्या आजच्या घडीला 24 लाखांच्या आसपास आहे. त्या तुलनेत ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या सफाई कर्मचार्यांची संख्या फारच अपुरी आहे तसेच प्रत्येक घरात दररोज किमान अर्धा किलो कचरा तयार होतो. आमच्या घरात हा कचरा निर्माण होत असला, तरी त्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प आमच्या भागात नको, अशी भूमिका घेणारे ठाणेकरही त्यास तितकेच जबाबदार आहेत. शहर कचरामुक्त करण्याचा विषय निघाला की दुसर्याने काय करावे, पालिका कशी बेजबाबदार आहे असे सांगताना ठाणेकर दिसतात. मात्र, आपण कचरा निर्माण करतो. मग त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आपलीही आहे, असा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने केला तर ठाणे शहर सहज कचरामुक्त होऊ शकेल.
घरात निर्माण होणार्या कचर्याची घरातच विल्हेवाट लावणे सहज शक्य आहे. त्यामुळे रस्त्यांवर दिसणारे कचर्याचे ढीग गायब होतील. दुर्गंधीही नाहीशी होईल तसेच भविष्यात ठाणेही पूर्णपणे अस्वच्छतामुक्त होईल. मात्र, त्यासाठी सत्ताधार्यांसह विरोधकांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टाळून लोकसहभागाची चळवळ करण्याची काळाची गरज आहे तसेच ठाणे शहरात विविध प्रभागांमध्ये शून्य कचरा मोहिमेसाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. ठाण्यात यंत्राद्वारे सार्वजनिक रस्त्यांची साफसफाई लवकरच सुरू होणार होती. मात्र, हे प्रयोग अजूनही प्रत्यक्षात सुरू झाले नसून कागदावरच आहेत तसेच अस्वच्छता करणार्या ठाणेकरांवर अंकुश ठेवण्यासाठी शहरात सफाई मार्शल नेमण्याची गरज आहे. जेणेकरून बेजबाबदार ठाणेकरांवर यामुळे आळा बसेल.
- प्रवीण शिंदे 9892784348