डॉ. युवराज परदेशी
विद्यार्थी आणि आंदालने हे नाते खूप जुने आहे. विद्यार्थी दशेत तरुणाईचे नेतृत्व करणार्या अनेकांनी आज राजकीय क्षेत्रात विशिष्ठ उंची गाठली आहे. सध्या विद्यार्थ्यांची दोन आंदोलने चर्चेत आहेत. यात पहिले म्हणजे डावे आणि तथाकथित पुरोगामी विद्यार्थ्यांचा अड्डा म्हणून ओळखले जाणार्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यापीठातील आंदोलन व दुसरे म्हणजे हाँगकाँगमध्ये प्रत्यार्पण आंदोलनाविरुध्द सुरु असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका. चीनने प्रस्तावित वादग्रस्त विधेयक मागे घेतल्यानंतरही हाँगकाँगमध्ये सुरू असलेले आंदोलन संपण्याची चिन्हे नाहीत. जूनपासून सुरू असलेले हे आंदोलन आता हाँगकाँगच्या एका मोठ्या विद्यापीठ प्रांगणात येऊन पेटले आहेे. तिथे आंदोलक विद्यार्थी पोलिसांवर पेट्रोल बाँब आणि धनुष्यबाणांचा वर्षाव करत असल्याने पोलीस आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. इकडे भारतात फि वाढीच्या निषेधार्थ जेएनयूचे विद्यार्थी थेट संसदेवर धडकल्याने त्यांना दिल्ली पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद खावा लागला. दोन्ही ठिकाणी कारणे वेगवेगळी असली ही आंदोलने अस्वस्थ तरुणाईची लक्षणे आहेत.
संसदेवर हल्ला करणारा कुख्यात दहशतवादी अफझल गुरूच्या फाशीला वर्ष झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करून जेएनयूमध्ये भारतविरोधी घोषणाबाजी करणार्या तुकडे-तुकडे गँगपासून विद्यार्थी निवडणुकांमधील गुंडागर्दी, सत्ताधार्यांची हेटाळणी करणे, त्यांना पक्षपाती ठरवणे आणि सत्ताबदल करण्यासाठी लढणे, आदी मुद्दे जेएनयू्तील बहुतांश विद्यार्थ्यांच्या अजेंड्यावर असतात. कोणत्याही बंधनांना न झुगारणारे विद्यापीठ अशी जेएनयूची ओळख निर्माण झाली आहे. यातून दहशतवादाचे समर्थन करणारे उमर खालिद सारखे विद्यार्थी नेतेही प्रकाशझोतात आले. वैचारिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक देशविरोधी कारवायांचे हे उगमस्थान मानले जाते. अनेक नक्षलवादी आणि माओवादी विद्यार्थ्यांना इथून अटक करण्यात आलेली असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. ही नकारात्मक बाजू असली तरी या विद्यापीठाने अनेक विचारवंत, संशोधक देशाला दिले आहेत. यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारिताषिक विजेते अभिजित बॅनर्जी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि मेनका गांधी, माकप नेते सीताराम येचुरी आणि प्रकाश करात, सुखदेव थोरात, पत्रकार पी. साईनाथ यासारखे अनेक सेलेब्रिटी याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. परंतू या चांगल्या बाबींऐवजी वेगळ्याच कारणामुळे हे विद्यापीठ सातत्याने चर्चेत असते. गेल्यावर्षी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याच्या आरोपावरुन जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. सध्या सुरु असलेले आंदोलन फि वाढी विरोधात आहे मात्र सध्याची फि व वाढीची रक्कम पाहता हे आंदोलन खरोखरच फि वाढी विरोधात आहे का अन्य कशासाठी? यावर शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कारण वसतिगृहामधील सिंगल सिटर रूमचा दर आतापर्यंत केवळ 20 रुपये इतका होता तो 600 रुपये इतका करण्यात आला असून डबल सिटर रूमच्या भाड्याचा दर दरमहा 10 रुपयांवरून 300 रुपये इतका करण्यात आला आहे. या खेरीज वसतिगृहामधील विद्यार्थ्यांवर ड्रेस कोडचीही सक्ती करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकाराला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. मुळात जेएनयूमध्ये शिक्षणासाठी येणारे सर्वच खरोखरच विद्यार्थी आहेत का? याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. येथे शिक्षण कमी व राजकारण जास्त असल्याने विद्यापीठातील एकंदरीत वातावरण पोषक राहिलेले नाही. मध्यंतरी जेएनयू हे देशद्रोही लोकांचा अड्डा बनला असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. वास्तविक या विद्यापीठाचा नावलोैकिक आणि पूर्वपीठिका देदीप्यमान आहे. जेएनयूच्या नावाला मोठे वलयही आहे. पण त्यांचा हा सारा लौकिक तेथील बिघडलेल्या वातावरणामुळे लयाला चालला आहे. याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवलेले नाही. विद्यार्थ्यांच्या भावना सातत्याने का भडकत आहेत किंवा भडकवल्या जात आहे? याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. कारण लहान लहान मुद्यांवरुन थेट देशव्यापी आंदोलनाची धग धुसफुसणे ही देशाच्या प्रगतीसाठी घातक आहे. ही आंदोलने ही अस्वस्थ तरुणाईची लक्षणे आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी कोणते मुद्दे तरुणाईला अस्वस्थ करत आहेत किंवा त्यांच्या भावना भडकवण्यासाठी पेट्रोल सारखे काम करत आहेत? यावर मंथन करण्याची आवश्यकता आहे. आपण मोठ्या अभिमानाने सांगतो की भारत हा जगातील सर्वात युवा देश आहे. मग देशातील युवा पिढी भरकटली तर कसे होईल? याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. तिकडे हाँगकाँगमधील आंदोलनाबाबत आपण समजू शकतो की, आंदोलक तरुणांना चीनच्या दडपशाहीची चीढ आहे. तेथील आंदोलनाचे कारण म्हणजे, हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांनी तैवानमधील एका हत्येच्या गुन्ह्यात हव्या असलेल्या एका व्यक्तीच्या प्रकरणात सध्याच्या प्रत्यार्पण कायद्यात सुधारणा सुचवणारे विधेयक मांडले होते; परंतु तेथील स्थानिकांनी त्या विरोधात उग्र निदर्शने सुरू केली होती. हे विधेयक मागे घेतल्यानंतरही आंदोलन थांबण्याची चिन्हे नाहीत. ही आंदोलने ज्याच्या अटकेमुळे सुरू झाली त्या चॅन टाँग काई याची तुरुंगातून अन्य एका प्रकरणात सुटका झाली. त्याने पुन्हा तैवानमध्ये परतण्याची तयारी दर्शवली असली, तरी हाँगकाँगने त्याला विरोध दर्शवला आहे. तसेच आता हाँगकाँगच्या नेतेपदासाठी थेट निवडणुका घ्याव्यात, ही मागणी पुढे करुन आंदोलन सुरुच आहे. पॉलीटेक्निक विद्यापीठात आंदोलकांनी स्वत:चा तळ बनविला असल्याने सध्या विद्यापीठाला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले आहे. सैनिकांनी याला चहुबाजूंनी याला वेढा घातला आहे. त्यामुळे चौकाचौकात, नाक्यानाक्यांवर बॅरिकेड्स उभी दिसतात, जिथे विद्यार्थी पाहारा देत आहेत. काही महिन्यांपूर्वीही हाँगकाँगमध्ये मोठे आंदोलन झाले होते तेंव्हा लाखो निदर्शकांचे नेतृत्व पोरसवदा जोशुआ वाँग नामक एक विशीतील विद्यार्थ्याने केले होते. हाँगकाँगमध्ये 2014 मध्ये ‘अम्ब्रेला मूव्हमेंट’ या लोकशाहीवादी निदर्शनांचे नेतृत्व करण्यात तो आघाडीवर होता. मागील निदर्शनांमुळे कारागृहात डांबलेल्या जोशुआची सरकारला जनमताच्या रेट्यामुळे अखेर लवकर सुटका करावी लागली. ही तरुणमंडळी इतकी अस्वस्थ का आहेत? याचे उत्तर शोधून जोपर्यंत शास्वत तोडगा काढला जात नाही तो पर्यंत अशा प्रकारच्या आंदोलनांचा आगडोंब उसळतच राहील.