बर्कले : 2014 मधील काँग्रेसची वाटचाल हा आजही संशोधनाचा विषय आहे. काँग्रेसमधील काही मान्यवरसुध्दा हे मान्य करतात की, यूपीए-2 सरकारच्या कार्यकाळात घोटाळ्यांनी काँग्रेसचा चेहरा विद्रूप केला होता. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत मायभूमीत नेहमीच तोंडावर बोट ठेवले आहे. परंतु, मंगळवारी अमेरिकेतील बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत राहुल गांधी यांना अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे काँग्रेसच्या चुका कबूल केल्या. अहंकाराने काँग्रेसला 2012 मध्येच ग्रासले होते आणि त्यामुळेच पुढे पराभव झाला, असे राहुल यांनी प्रांजळपणे कबूल केले. यावेळी त्यांनी नोटाबंदी, वाढता हिंसाचार, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवर अतिशय चपखलपणे भाष्य केले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अशा महत्वाच्या मुद्द्यांवर राहुल यांनी भाष्य केल्याने त्याचे मोठे पडसाद भारतात विशेषत: भाजपमध्ये उमटू लागले आहेत.
आमच्याकडून चुका झाल्या
राहुल म्हणाले, 2012 पासून आमच्याकडून चुका झाल्या. आम्ही जनतेशी संवाद बंद केला होता. यानंतर आम्हाला पक्षाचे पुनर्निर्माण करणे गरजेचे होते. आम्हाला एक असे रूपरेषा आखायला हवी होती, ज्यामुळे पक्षाला पुढे जाता आले असते. तुम्ही पाहिलेत तर सध्या भाजप जे काही करत आहे ते आम्ही यापूर्वीच केले आहे. मनरेगा आणि जीएसटी ही त्याची उदाहरणे आहेत.
घराणेशाहीची केली पाठराखण
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, डीएमकेचे नेते स्टॅलिन, भाजपचे खासदार अनुराग ठाकूर, अभिषेक बच्चन, अंबानी परिवाराचा रिलायन्स उद्योगसमूह ही सगळी घराणेशाहीचीच उदाहरणे आहेत. मग मला एकट्याला लक्ष्य का करता? सगळा देशच घराणेशाहीवर चालला, असा युक्तिवाद राहुल गांधी यांनी यावेळी करत स्वतःचा आणि काँग्रेसचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. राहुल म्हणाले, काँग्रेसमधील घराणेशाहीचे मी काहीच करू शकत नाही. ज्या व्यक्तीला वारसाहक्काने अधिकार मिळतात ती किती सक्षम आहे, किती संवेदनशील आहे, हे मला जास्त महत्त्वाचे वाटते
काश्मीर मुद्द्यावर सरकारला अपयश
काश्मीर मुद्द्यावर नऊवर्षांपूर्वी मी तत्कालीन पंप्रधान मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि जयराम रमेश यांच्यासह काम केले होते. काश्मीरमध्ये जेव्हा मी काम सुरू केले तेव्हा टोकाचा दहशतवाद तेथे होता. यानंतर आम्ही शांतता आणि मैत्रीपूर्ण वातावरण वाढविण्यासाठी यशस्वी काम केले. परंतु, यासाठी आम्ही मोठी-मोठी भाषणे दिली नाहीत. भारतविरोधी विचार संपविण्यासाठी आम्ही काश्मीरमध्ये पंचायतराजचे काम केले.
नोटाबंदीमुळे कंबरडे मोडले
राहुल यांनी यावेळी नोटाबंदीवर जोरदार टीका केली. नोटाबंदी लागू करण्यासाठी मुख्य अर्थिक सल्लागार किंवा संसदेचे मतही जाणून घेतले गेले नाही. नोटाबंदीमुळे जीडीपीमध्ये दोन अंकाची घसरण झाली आहे. भारतात नवीन नोकर्या निर्माण होत नाहीत. आर्थिक विकासचा वेगही वाढताना दिसत नाही. चुकीच्या अर्थिक निर्णयांमुळे शेतकर्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकारने नुकत्याच धेतलेल्या काही आर्थिक निर्णयांमुळे एकूणच अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
हिंसा मी जवळून पाहिली
हिंसाचाराबद्दल राहुल गांधी म्हणाले, मी माझे वडील गमावले आहेत. माझी आजी हिंसेची शिकार झाली. हिंसाचार हा माझ्यापेक्षा कोणाला अधिक कळू शकतो? देशात सध्या पत्रकारांवर हल्ले होत आहे. दलितांना मारले जात आहे. मुस्लिमांना बीफ खात असल्याच्या संशयाने मारले जात आहे. अशी स्थिती देशात याआधी नव्हती. मोदींनी देशात माहिती अधिकार कायदा नष्ट केला आहे. आम्ही जेव्हा पारदर्शकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा अनेक समस्यांचा सामना करावा लागला. काँग्रेस आपली धोरणे आणि विचार हे चर्चेतून निश्चित करते. ते कोणावरही थोपले जात नाही. किंवा बळजबरी लादले जात नाही. अहिंसेचा विचार संपवला जात आहे. खरे पाहिले तर त्याच मार्गाने मानवतेला पुढे नेले जाऊ शकते. राहुल गांधी यांनी केलेल्या या टीकेमुळे घायाळ झालेल्या भाजपने त्यांना तातडीने प्रत्युत्तरही दिले आहे. स्मृती इराणी यांनी म्हंटले की, यांचे देशात कुणी ऐकत नाहीत म्हणून परदेशात जाऊन बोलत आहेत.