अहमदनगरजवळ भीषण अपघात:1ठार ३० जखमी

0

अहमदनगर: मुंबईतील ‘टाटा कॅन्सर’ व इतर रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाला घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला आज पहाटे अहमदनगर शहराजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बसचालक ठार झाला असून ३० डॉक्टर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला डॉक्टरांचाही समावेश असून सर्वांना अहमदनगर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अहमदनगर शहराजवळील केडगाव बायपासवर हा अपघात झाला. मुंबईहून वेरूळला निघालेल्या या बसमध्ये एकूण ४० डॉक्टर होते. हे सर्व डॉक्टर कर्करोगतज्ज्ञ असल्याचं समजतं. रेडिएशन ओन्कलॉजी व इतर वेगवेगळ्या विभागात ते कार्यरत आहेत. औरंगाबादमध्ये होणाऱ्या एका मेडिकल कॉन्फरन्ससाठी ते निघाले होते.

पहाटे पावणे चार वाजता केडगाव बायपासवरील नील हॉटेलसमोर डॉक्टरांची लक्झरी बस पाठीमागून एका कंटेनरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अर्ध्या गाडीचा चक्काचूर झाला. डॉ. पुष्कर इंगळे, अनिल टिबडेवाल, जानी कार्टन हे तीन डॉक्टर गंभीर जखमी असून, त्यांना नगरमधील खासगी मक्सकेअर हब रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अन्य ३७ डॉक्टर किरकोळ जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.