राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक
मारेकरी संजय गुंजाळ पोलिस ठाण्यात हजर
दोन शिवसेना पदाधिकार्यांची हत्या
अहमदनगर : केडगावमध्ये शिवसेनेच्या दोन पदाधिकार्यांची शनिवारी हत्या झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून वातावरण तणावपूर्ण आहे. रविवारी अहमदनगरमध्ये केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवसैनिकांनी पाथर्डीत रास्ता रोको केला. नेवाशात सोमवारी तर कर्जतला मंगळवारी बंद पाळण्यात येणार आहे. तणावाची स्थिती असल्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे नगरमध्ये दाखल झाले होते. पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते हेदेखील अहमदनगरमध्ये आले होते. केडगाव पोटनिवडणूक निकालानंतर शनिवारी सायंकाळी शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील हल्लेखोर संदीप गुंजाळ हा देखील शनिवारी रात्री पोलिस ठाण्यात हजर झाला. तो सुद्धा एका राजकीय पक्षात सक्रिय होता, असे सुत्रांनी सांगितले.
हत्याकांडाला राजकीय पार्श्वभूमी
शनिवारी केडगाव उपनगरातील भररस्त्यात शिवसेनेच्या पदाधिकार्यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली होती. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली होती. संजय कोतकर (वय 55) आणि वसंत ठुबे (वय 40) अशी या पदाधिकार्यांची नावे आहेत. संजय कोतकर हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते. केडगावमधील महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ही घटना घडल्याने नगरमधील वातावरण तापले आहे. मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर (वय 25) याने या प्रकरणात फिर्याद दाखल केली आहे. या दुहेरी हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम अरुण जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार अरुण बलभीम जगताप, भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी भानुदास कर्डिले तसेच खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास एकनाथ कोतकर व कांग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी प्रत्यक्ष हत्याकांड घडवून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे गुन्ह्यात 120 ब (संगनमताने कट रचणे), खून, दंगल, भारतीय हत्यार कायदा कलम लावण्यात आले आहे. दरम्यान, संदीप गुंजाळ याने पारनेर पोलिस ठाण्यात स्वत: हजर होत गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली. गुंजाळ याच्याकडून एक गावठी कट्टा, गुप्ती व पत्रकार असल्याचे ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे.
मला गोळ्या घातल्या, तुम्ही ताबडतोब या
केडगावातील पोटनिवडणूक पार पडल्यानंतर विरोधकांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबतचे निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे गेले होते. निवेदन देऊन बाहेर येताच जखमी संजय कोतकर यांचा शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या मोबाइलवर फोन आला. मला गोळ्या घातल्या आहेत, तुम्ही ताबडतोब या, मारेकरी वसंताच्या मागे गेले आहेत, असे कोतकर म्हणाल्याचे सातपुते यांनी सांगितले. दरम्यान, या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील वातावरण तणावपूर्ण असून रविवारी केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड येथे कडकडीत बंद पाळला.
25 जणांविरोधात फिर्याद
मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. फिर्यादीत नऊ जणांची नावे नमूद करण्यात आली, तर अन्य अज्ञात असा उल्लेख आहे. दरम्यान, पत्रकार, छायाचित्रकारही घटनेची माहिती घेण्यासाठी पोहोचले असता संतप्त जमावाने पोलिस व पत्रकारांना शिवीगाळ करत दगडफेक केली. काहींना जमावाने धक्काबुक्की केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्सला पाचारण करण्यात आले होते.
पालकमंत्री थीम पार्कच्या उद्घाटनाला
अहमदनगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण असताना पालकमंत्री राम शिंदे मात्र एका खासगी कार्यक्रमाला हजर होते. शिर्डीत मालपाणींच्या थीम पार्कच्या उद्घाटनासाठी त्यांनी हजेरी लावली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटीलही या सोहळ्याला उपस्थित होते. कायदा सुव्यवस्थेचा विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा रद्द केला. राज्यातील मंत्री अहमदनगरला येत असताना पालकमंत्री राम शिंदे मात्र कौतुक सोहळ्यात व्यस्त असल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.
भाऊबंदकीतून हत्या, राजकीय वळण नको
ही हत्या राजकीय कारणावरून झाली नसून ती आपसातील भाऊबंदकीतून झाली आहे. याला आता राजकीय वळण दिले जात आहे. मारणारे आणि मृतक यांचे नातेवाईक हे सर्व पक्षात आहेत. बर्याच दिवसातून त्यांच्यात ही भांडणे चालू होती. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील वादामुळे ही घटना घडलेली नाही. त्यामुळे शिवसेनेने याला राजकीय वळण देऊ नये.
-नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करा
डीवायएसपी अक्षय शिंदे, निरीक्षक अभय परमार यांच्या संगनमताने हे हत्याकांड झाले आहे. त्यांची हकालपट्टी करावी. पोलिसांना कल्पना देऊन त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. शिवसेना या गुन्हेगारांना सोडणार नाही. यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. हे सर्व प्रकरण संघटितपणे केले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करा.
-रामदास कदम, पर्यावरणमंत्री