नवी दिल्ली – सहाशे वर्षे जुने आणि सभोवताली तटबंदी असलेल्या अहमदाबादचा समावेश आता युनेस्कोच्या जागतिक वारसा शहर (वर्ल्ड हेरिटेज सिटी) यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे पॅरिस, व्हिएन्ना, कैरो, ब्रुसेल्स, रोम आणि एडिनबर्ग या शहरांच्या पंक्तित आता अहमदाबादही बसले आहे. जागतिक वारसा शहराचा दर्जा अहमदाबादला देण्याचा निर्णय युनेस्कोने जाहीर केला आहे.
२०१० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादवरील ऐतिहासिक कागदपत्रे युनेस्कोला पाठवली होती. फोर्ड फाउंडेशनने १९८४ मध्ये अहमदाबाद शहराच्या परंपरा अबाधित रहाव्या म्हणून प्रकल्प आखले होते. अहमदाबादेत २५ पुरातत्व स्थळे आहेत. तटबंदी असलेल्या शहरात अनेक लोकसमुह पोळ मध्ये एकत्र रहात असत. अनेक वास्तू आणि जागा महात्मा गांधींशी संबंधित आहेत. १९१५ ते १९३० या कालावधीत गांधीजी अहमदाबाद येथे वास्तव्यास होते.
जागतिक वारसा समितीच्या पोलंडमधील कार्लो शहरातील बैठकीत अहमदाबादला असा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे युनेस्कोच्या प्रतिनिधी रूचिरा कंबोज यांनी सांगितले. जगातील २८७ शहरे अशी जागतिक वारसा शहरे आहेत. भारतीय उपखंडात नेपाळमधील भक्तपूर, श्रीलंकेतील गल्ले आधीच वारसा यादीत आहेत. युनेस्कोच्या समितीने पॅलेस्टाईनमधील हेब्रॉन अल खलिल शहराचा समावेश यादीत केला आहे. अहमदाबादच्या नामनिर्देशनाला तुर्की, लेबेनॉन, ट्युनिशिया, पोर्तुगाल आदी देशांनी पाठिंबा दिला. सहाशे वर्षांहून अधिक काळ अहमदाबाद शांती आणि समृद्धीचे प्रतिक आहे. महात्मा गांधींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरूवात अहमदाबादपासून सुरू केली. शहरात जैन आणि हिंदू मंदीरे आहेत. या वास्तु मुस्लिम व हिंदु कलापरंपराशी संबंध सांगतात. पारंपरिक शहर असले तरी अहमदाबाद कालानुरूप स्मार्ट सिटी सुद्धा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करून अहमदाबादला जागतिक वारसा शहराचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.