दोघा आरोपींना अटक ; धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केली गुन्ह्याची उकल
धुळे- सोनगीर-दोंडाईचा महामार्गावर अहमदाबादमधील गोपाल मोतीलाल काबरा (49) या रीअल इस्टेट एजंटाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवार, 31 मे रोजी पहाटे उघडकीस आली होती. सुरुवातीला दरोड्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता होती मात्र धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात गुन्ह्याचा उलगडा करण्यास वरीष्ठ निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या सहकार्यांना यश आले आहे. जमिनीच्या व्यवहारापोटी काबरा यांना दहा कोटी देणे असल्यानेच आरोपींनी संनगमत करून काटा काढल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांना न्यायालयाने 10 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पत्नीचा संशय ठरला खरा
मयत काबरा यांच्या पत्नी कांचन गोपाल काबरा यांनी पतीच्या हत्येला रीअल इस्टेट एजंट राजीव त्रिवेदी, चालक ललितभाई तसेच विजय हे जवाबदार असल्याचा आरोप करीत खुनाचा गुन्हा नोंदवला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या आरोपाच्या अनुषंगानेही तपास करून अहमदाबाद, भरूच, गुजरात, भोपाळ, इंदौर आदी ठिकाणी पथके रवाना केली होती. संशयीत राजू उर्फ विहांग बिपीनचंद्र त्रिवेदी (अटलदरा, बडोदा) यास ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे शाखेने केलेल्या बारीक चौकशीनंतर गुन्ह्याचा उलगडा झाला.
जमिनीच्या व्यवहारातून काढला काटा
मयत गोपाळ काबरा यांचे राजु उर्फ विहांग त्रिवेदी यांच्याकडे राजपिपला व बाबला, जि.अहमदाबाद, गुजरात येथील जमीन विक्रीपोटीचे दहा कोटी रुपये घेणे होते. काबरा या रकमेबाबत आरोपी त्रिवेदीकडे तगादा लावत असल्याने आरोपीने काबरा यांना 30 मे रोजी शिर्डी येथे बोलावले होते व दहा कोटींच्या रकमेऐवजी काबरा या किंमतीएव्हढे हिरे रात्री अडीच वाजेच्या मुहूर्तावर देण्याचे आरोपीने मान्य केल्याने काबरा येथे शिर्डीत कारने पोहोचले होते. ठरल्याप्रमाणे काबरा हे शिर्डीत आल्यानंतर आरोपीने त्यांना अस्सल हिर्यांऐवजी अमेरीकन डायमंड देवून त्यांची फसवणूक केल्याची बाबही तपासात उघड झाली आहे.
सोनगीर चौफुलीवर काढला काटा
आरोपी त्रिवेदीने काबरा यांचा काटा काढण्यासाठी संशयीत आरोपी ललित, विजय पटेल व अन्य एकाची मदत घेतली. दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल धनश्रीपुढे काबरा यांची कार आल्यानंतर त्यांच्या डोक्यावर अवजड वस्तूने हल्ला चढवण्यात आला तसेच मारहाणही करण्यात आल्याने काबरा यांचा मृत्यू झाला. आरोपींनी खुनाची घटना उघडकीस येवू नये यासाठी अपघाताचाही बनाव केला मात्र पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली.
दोघा आरोपींना 10 पर्यंत पोलिस कोठडी
काबरा यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी राजू उर्फ विहांग बिपीनचंद्र त्रिवेदी (अटलदरा, बडोदा) व क्रिष्णा सोमानी यांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींना 3 रोजी धुळे न्यायालयात हजर केले असता 10 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यात अन्य संशयीत पसार असून त्यांचाही कसून शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गुन्हे शाखेच्या या कामगिरीनंतर धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पथकाला 15 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.राजु भुजबळ, उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह उपनिरीक्षक राजेंद्र मांडेकर, उपनिरीक्षक हनुमान उगले, उपनिरीक्षक राम सोनवणे, उपनिरीक्षक अनिल पाटील, महाले, हवालदार संदीप थोरात, हवालदार सुनील विंचुरकर, नाईक प्रभाकर बैसाने, श्रीकांत पाटील, अशोक पाटील, कुणाल पाटील, उमेश पवार, रवी किरण राठोड, गौतम सपकाळे, राहुल सानप, वसंत पाटील, सोनवणे, विशाल पाटील, तुषार पारधी, चेतन विलास पाटील आदींच्या पथकाने केली.