अहमदाबादच्या हिरे व्यापार्‍याचा सोनगीरजवळ निर्घूण खून

0

अडीच कोटींचे हिरे लांबवले ; शिर्डीवरून परतताना सापळा रचून लूट

धुळे- सोनगीर-दोंडाईचा महामार्गावर अहमदाबादच्या हिरे व्यापार्‍याचा खून झालेला मृतदेह गुरुवारी पहाटे आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोपाल मोतीलाल काबरा (49) असे मयताचे व्यापार्‍याचे नाव असून व्यापार्‍याकडील सुमारे अडीच कोटी रुपयांचे हिरे अज्ञात दरोडेखोरांनी लांबवल्याची भीती आहे. हिरे व्यापारी हा एकटाच प्रवास करीत होता की त्याच्यासोबत चालक वा अन्य साथीदार होते? या बाबींची पोलिसांकडून बारकाईने चौकशी केली जात आहे. पोलिसांनी मात्र या प्रकरणाबाबत सावध भूमिका घेत चौकशी सुरू असल्याचे सांगत हिरे लुटीच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

हिरे व्यापारी नव्हे इस्टेट ब्रोकर्स?
अहमदाबाद येथील हिर्‍यांचे व्यापारी गोपाल मोतीलाल काबरा (49, सरोज सोसायटी, बँक ऑफ बडोदाजवळ, झेवीयर्स कॉलनी, नवरंगपुरा, अहमदाबाद, गुजरात) हे आपल्या स्विफ्ट डिझायर कार (जी.जे.1 के.ई.6095) ने शिर्डी येथे 28 मे रोजी रवाना झाले होते. काबरा हे हिरे व्यापारी आहेत वा नाहीत याबाबत पोलिसांनी संभ्रम व्यक्त केला असून ते रीअल इस्टेट ब्रोकर्स असल्याची माहिती पोलिसांना सांगत शिर्डी येथे एका व्यवहारासाठी ते एकटेच गेल्याचे सांगितले. संबंधिताशी डील झाल्यानंतर ते शिर्डीहून कारने परतीच्या प्रवासात असताना गुरुवारी पहाटे तीन ते सकाळी सात वाजेदरम्यान सापळा रचून बसलेल्या दरोडेखोरांनी सोनगीरजवळील हॉटेल धनश्रीजवळ त्यांचा ून केल्याचा संशय आहे. मयताच्या डोक्याला व कंबरेला गंभीर दुखापत झाल्याच्या खुणा आढळल्या आहेत. काबरा यांच्या अंगावरील कपडे काढण्यात आले असून घटनास्थळापासून काही अंतरावर त्यांचा बुट आढळला असून काही अंतरावर गाडीच्या टायरांचे निशाण उमटले आहेत त्यामुळे व्यापारी व लुटारूंमध्ये झटापट झाली असावी, असादेखील कयास आहे. दरम्यान, व्यापार्‍याच्या वाहनात सापडलेली स्फटीके नकली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

धुळे पोलिस अधीक्षकांची धाव
घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व उपनिरीक्षक राजेंद्र पाटील व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तर धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे़ ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्‍वानाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग दाखवल्याने संशयीत आरोपींनी व्यापार्‍याचा खून करून ऐवज लांबवला असावा, असा संशय आहे. दरम्यान, मृत गोपाल काबरा यांचा मृतदेह धुळे येथील जिल्हा रुग्णालयात आणले आहे. गोपाल काबरा यांच्या खुनाची माहिती अहमदाबादस्थित त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

कुटुंबाच्या माहितीनंतरच उलगडा -उपअधीक्षक
पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या माहितीनुसार, मयत हा हिर्‍यांचा व्यापारी नसून त्यांचा रीअल इस्टेट ब्रोकर्सचा व्यवसाय आहे. 28 रोजी ते अहमदाबाद येथून एकटेच शिर्डीला व्यवसायानिमित्त गेले होते व परतीच्या प्रवासात हा प्रकार घडला आहे. शिर्डी येथे ज्यांच्याशी व्यापार्‍याची बैठक झाली त्या इसमासही आम्ही ताब्यात घेण्यासाठी एक पथक रवाना केले असून अहमदाबाद येथेही अधिक माहितीसाठी दुसरे पथक रवाना केले आहे. मयताच्या कुटुंबाच्या अधिकृत माहितीनंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असेही त्यांनी सांगितले.