अहमदाबादच्या व्यापार्‍याच्या खूनप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

0

मयताच्या पत्नीने दिली फिर्याद ; पोलिसांकडून बारकाईने चौकशी

धुळे- सोनगीर-दोंडाईचा महामार्गावर अहमदाबाद गोपाल मोतीलाल काबरा (49) यांचा खून करण्यात आला होता. सुरुवातीला काबरा हे हिरे व्यापारी असल्याची चर्चा असल्याने त्यांच्या ताब्यातून अडीच कोटींचे हिरेदेखील चोरीला गेल्याचे बोलले जात होते मात्र पोलिसांच्या खोलवर तपासाअंती काबरा हिरे व्यापारी नसून इस्टेट ब्रोकर्स एजंट असल्याचे सिद्ध झाले. मयत काबरा यांची पत्नी कांचन यांनी सोनगीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्टेटीच्या वादातून खून झाल्याचा संशय यात वर्तवण्यात आला आहे मात्र पोलिसांनी या शक्यतेसह परीस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे बारकाईने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा
मयता काबरा यांच्या पत्नी कांचन गोपाल काबरा यांच्या फिर्यादीनुसार राजीव त्रिवेदी, चालक ललितभाई तसेच विजय यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रीअल इस्टेट क्षेत्रातील वादातून पतीचा आरोपींनी खुन केल्याचा संशय कांचन यांनी वर्तवल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयत काबरा यांच्याकडे चालक ललितभाई हा कामास होता तर संशयीत राजीव त्रिवेदी हेदेखील इस्टेट ब्रोकर्स असून त्यांच्याकडे संशयीत विजयदेखील कामाला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मयतावर अहमदाबाद येथे अंत्यसंस्कार
मयत काबरा यांच्या मृतदेहावर शासकीय महाविद्यालयात शवविच्छेदन झाल्यानंतर गुरूवारी रात्री त्यांचा मृतदेह अहमदाबाद येथे हलवण्यात आल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांचे एक पथक शिर्डी पोहोचले असून दुसरे पथक अहमदाबादला रवाना करण्यात आले आहे. मयत काबरा शिर्डीत कुणा-कुणाला भेटले तसेच अहमदाबादमधील काबरा यांच्याशी संबंधीत व्यक्तींची चौकशी केली जात आहे. मयत काबरा यांच्यासोबत चालक ललितभाई तसेच संशयीत विजयदेखील असल्याची शक्यता असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला असलातरी ते अद्याप पोलिसांना गवसलेले नाहीत. दरम्यान, मयत काबरा यांच्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याचेही सूत्रांनी सांगितले मात्र त्याबाबत अधिक बोलण्यास यंत्रणेने नकार दिला. लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत म्हणाले.