खासदार रखा खडसे यांची भुसावळ शहरात ग्वाही ; मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्राचा शुभारंभ ; पुणे शहरासाठीदेखील विमान सेवा ; उड्डाण- 2 च्या टेंडराला लवकरच मंजुरी -खासदार ; जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने वाटचाल -आमदार
भुसावळ- सर्वसामान्य नागरीकांचे स्वप्न मोदी सरकार पूर्ण करीत असून आधी श्रीमंतांपुरता मर्यादीत असलेली विमानसेवा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली असून भुसावळ शहरात पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याची मोठी उपलब्धी आहे तर जळगाव विमानतळावर लवकरच उड्डाणसेवा सुरू होणार असून उड्डाण- टूच्या टेंडरला मंजुरी मिळाल्यानंतर नियमीत अहमदाबादसह मुंबईसाठी सेवा सुरू होणार असल्याची ग्वाही खासदार रक्षा खडसे यांनी दिली. ही सेवा सुरू झाल्यानंतर पुण्यासाठीदेखील विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्राचा शनिवारी त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
विमानप्रवास आता सामान्यांच्या आवाक्यात
खासदार खडसे म्हणाले की, पूर्वी केवळ विमान प्रवास केवळ श्रीमंत लोक करीत होते मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्यांचे स्वप्न हे सरकार पूर्ण करीत आहे. भुसावळसारख्या तालुक्याच्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरू होणे ही मोठी उपलब्धी आहे. जळगाव विमानतळावर मध्यंतरी विमानसेवा सुरू झाली असलीतरी नियमित प्रवासी मिळत नसल्याने ती बंद पडली मात्र उडान टूच्या टेंडर प्रक्रियेनंतर मुंबईसह अहमदाबादसाठी नियमित सेवा सुरू होणार असून पुण्यासाठीदेखील विमान सेवा सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे खडसे म्हणाल्या. खासदारांचे काम केंद्र सरकारच्या योजना नागरीकांपर्यंत पोहोचवणे असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, पूर्वी इंग्रजी बोलणारा अधिकारी केवळ मुंबईसारख्या शहरात दिसत होता मात्र आता तालुक्याच्या ठिकाणीही असे अधिकारी आल्याने हे आमच्या सरकारचे सक्सेस असल्याचे त्या म्हणाल्या. भुसावळातील पासपोर्ट कार्यालयामुळे हजला जाणार्या भाविकांची मोठी सोयी झाली असून पर्यटकांसह परदेशात जाणार्या विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळाल्याचे त्या म्हणाल्या.
ही तर जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने वाटचाल
आमदार संजय सावकारे म्हणाले की, भुसावळात पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याने ही जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. रक्षा खडसे या कर्तव्यदक्ष खासदार असून त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्यात आले असून 90 टक्के गावांपर्यंत त्यांनी संपर्क केला आहे. जळगाव विमानतळावर प्रवाशांची संख्या रोडावल्याने एअर पोर्ट चालू , बंद राहत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
पासपोर्ट कार्यालय नागरीकांसाठी मोठी उपलब्धी
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, भुसावळ शहरात पासपोर्ट कार्यालय सुरू होणे ही नागरीकांसाठी मोठी उपलब्धी आहे. शहरात विकासाचा यज्ञ सुरू झाला असून खासदारांच्या प्रयत्नाने झालेल्या पासपोर्ट कार्यालयामुळे आता नाशिकच्या वार्या कराव्या लागणार नाही त्यामुळे वेळेसह खर्चाची बचत होणार आहे. भुसावळ शहर जिल्हा होण्याच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबाचा पासपोर्ट काढताना पत्नीचे नाव चुकल्याने अनेकदा नाशिकच्या फेर्या माराव्या लागल्या मात्र काम झाले नाही, ते आता भुसावळात कार्यालय झाल्याने पूर्ण होईल, असे त्यांनी सांगताच उपस्थित खळखळून हसले.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदू महाजन, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी तुलसीदास शर्मा, बी.अर्मुगन, भुसावळ डाकघर अधीक्षक पी.बी.सेलूकर यांची उपस्थिती होती. पासपोर्ट केंद्राच्या शुभारंभाला पासपोर्टसाठी नोंदणी करणार्या जकिरोद्दीन भाई, शहनाज बी.काझी व केदार जयंत राजहंस या तिघांना मान्यवरांच्या हस्ते अपॉईनमेंट रीसीप्ट देण्यात आली.