अहमद पटेल यांच्या नाट्यमय विजयाने भाजपला धक्का

0

अहमदाबाद । गुजरातमधील राज्यसभेतील तीन जागांची झालेली निवडणूक चांगलीच गाजली. यात अमित शहा व स्मृती इराणी यांचा विजय पहिल्यापासून निश्‍चित असला तरी तर तिसर्‍या जागेसाठी भाजपने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याविरोधात बलवंतसिंह राजपूत यांना रिंगणात उतारल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. यात नाटयमय घटना घडून पटेल विजयी झाले.

भाजपला धक्का
राज्यसभेची निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. अमित शहा, स्मृती इराणींचा विजय निश्चित असला तरी अहमद पटेल याच्यासमोर मोठे आव्हान होते. भाजपने आधीच काँग्रेसच्या काही आमदारांना गळाशी लावल्याने खळबळ उडाली होती. यामुळेे पटेल यांची वाट बिकट मानली जात होती. मात्र निवडणुकीत पटेल यांनी भाजपला धक्का देत विजय मिळवला. पटेल यांना 44 मते पडली असून राजपूत यांना फक्त 38 मतेच मिळाली. यात काँग्रेसच्या दोन फुटीरांनी बाद झालेली मते निर्णायक ठरली.

सत्यमेव जयते !
रात्री उशीरा निकाल जाहीर झाल्यानंतर अहमद पटेल यांनी ट्विटरवरुन ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत भाजपवर टीका केली. सरकारी यंत्रणेचा, बळाचा आणि पैशांचा दुरुपयोग करणार्‍यांचा पराभव झाला असल्याचा टोला त्यांनी मारला. सूडाचे राजकारण करणार्‍या भाजपचे पितळ उघडे पडले. राजकीय दहशतवाद पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत गुजरातमधील जनताच त्यांना धडा शिकवेल असे पटेल यांनी म्हटले आहे.

देशभरातून अभिनंदन
अहमद पटेल यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेससह अन्य पक्षाच्या नेत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेनेही पटेल यांचे अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळातील मान्यवरांच्या भुवा उंचावल्या आहेत. तर जेडीयूचे नाराज नेते शरद यादव यांनीही ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले. यादव यांनी ट्विटसोबत अहमद पटेल आणि त्यांचा फोटोही शेअर केला. मोठ्या अडथळ्यांचा सामना करून राज्यसभेच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्हाला भावी कारकिर्दीतही असेच यश मिळो, असा संदेश ट्विटमध्ये लिहला होता. त्यामुळे आता शरद यादव हे नितीशकुमार यांची साथ सोडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.