शिंदखेडा । येथील भगवा चौक ते शिवाजी चौफुली दरम्यान झालेल्या रस्ता काँक्रिटीकारणाची नाशिक येथील क्वालिटी कंट्रोल पथकाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल याबाबतचे निवेदन शहरातील नागरीकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. दहा महिन्यांपूर्वी रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांनी भगवा चौक ते शिवाजी चौफुली दरम्यान 75 लाख रुपये खर्चाचे रस्ता काँक्रीटच्या कामाचे उदघाटन केले होते. सदर रस्ता हा निष्कृट दर्जाचा होत असल्याचे शहरातील तरुणांनी शासनाचा निदर्शनास आणून दिले. तसेच या संदर्भात शहरातील विविध संघटनांनी वेळोवेळी स्थानिक बांधकाम विभागाला तक्रारी केल्या आहेत. परंतु त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे.
क्वॉलिटी कंट्रोल अहवालाची मागणी
पहिल्या पावसातच रस्त्याला खड्डे पडले होते. यामुळे शहरातील तरुणांनी बांधकाम विभागाला निवेदन देऊन क्वालिटी कंट्रोल विभागाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. यानुसार क्वालिटी कंट्रोल नाशिक येथील पथकाने चौकशी केली. परंतु चौकशी ला 5 महिने झाले मात्र अजूनपर्यंत क्वालिटी कंट्रोल चा अहवालाची माहिती देण्यात आली नाही. याबाबत शहरातील नागरिकांनी बांधकाम विभागाला 5 दिवसाचा आत क्वालीटी कंट्रोल विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत माहीती द्यावी अन्यथा 6 नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर योगेश चौधरी, रोहित पाटील, गजानन बड्गुजर, नंदकिशोर पाटील, अमोल निकम, सागर बड्गुजर, जीवन देशमुख, राजेंद्र मराठे, गणेश परदेशी,हर्षल पाटोले,योगेश कुवर, प्रकाश पाटोले , जयेश पाटील, सह आदींच्या सह्या आहेत