अहिंसावादी जैन धर्मियांनी संघटित व्हावे

0

बिबवेवाडी । जैन धर्म हा अहिंसावादी आहे. काही राजकीय लोक जैन साधूंवर टीका करीत आहेत. अहिंसा, शाकाहार, जीवदया आणि सद्विचारांची पूजा करणार्‍या जैन धर्मावर येणारी अशा प्रकारची संकटे टाळण्यासाठी सर्व जैन धर्मियांनी आपापले पंथ विसरून एकत्र यावे, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले.

बिबवेवाडी जैन श्रावक संघामध्ये पर्युषण पर्वात जैन एकता दिवसानिमित्त प. पू. प्रीतिसुधाजी महाराज आणि मधुस्मिताजी महाराज यांच्या सान्निध्यात संपन्न झालेल्या कार्यक्रमात डॉ. गंगवाल बोलत होते. याप्रसंगी बिबवेवाडी श्रावक संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष रमेश गुगळे, माणिक दगड, गणेश ओसवाल, चंद्रकांत लुंकड, रामलाल संचेती, चंपालाल नहार, अविनाश कोठारी, पन्नालाल पितळे, बाळासाहेब कर्नावट, कुणाल ओसवाल यांच्यासह हजारो जैनधर्मीय उपस्थित होते.

सन्मान समाजाचा मुलभूत पाया
दोन वर्षांपूर्वी जयपूर उच्च न्यायालयाने संथारा या धार्मिक विधीवर बंदी घातली होती. त्यावेळी सर्व जैन बांधव एकत्र आले होते. हा निर्णय मागे घेण्यात आला होता. त्याचेच औचित्य साधून 24 ऑगस्टला जैन एकता दिवस साजरा केला जातो. जैन धर्म हा अनादिकालापासून अस्तित्वात आहे. वेदांमध्येही जैन तीर्थंकराचा उल्लेख आदरपूर्वक केलेला आहे. पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाला सन्मान देणे हा समाजाचा मूलभूत पाया आहे. अहिंसा, जीवदया हा या धर्माचा गाभा आहे. त्याच्या संवर्धनासाठी जैन बांधवानी एकता दाखविणे गरजेचे आहे, असे डॉ. गंगवाल यांनी सांगितले.

एकात्मतेचा आदर्श ठेवा
संपूर्ण समाजाने आपल्यातील एकता टिकवली पाहिजे. अनेक पंथांमध्ये न विखुरता एकत्रिपणे धर्मावर आलेल्या संकटाचा प्रतिकार केला पाहिजे. आपल्यातील अहिंसा प्रत्येकाने जपायला हवी. अहिंसा, शाकाहार, जीवदया आणि सद्विचारांचा प्रचार व प्रसार करून समाजासमोर एकात्मतेचा आदर्श जैन समाजाने ठेवला पाहिजे, असे प्रीतिसुधाजी म. सा. यांनी यावेळी सांगितले. मधुस्मिताजी महाराज यांनी जैन एकतेवर एक भजन प्रस्तुत केले.