महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
भोसरी : भगवान महावीर जयंतीनिमित्त येत्या गुरूवारी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात यावेत. महावीर जयंती अहिंसेच्या मार्गाने साजरी व्हावी. भगवान महावीरांनी अहिंसेचा संदेश दिला आहे. त्यामुळे निदान महावीर जयंती दिवशी तरी या मुक्या जनावरांची कत्तर होऊ नये, असे वाटते. यासाठी शहरातील मटण, चिकन व मांस विक्रेते यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत. महावीर जयंती रोजी प्राण्यांची कत्तल होऊ नये, असे आवाहन भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
शहरात सवधर्मियांचे वास्तव्य
कत्तल होऊ न देण्याचे निवेदन आमदार लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये आमदार लांडगे म्हटले आहे की, महावीर स्वामी यांनी ‘जिओ और जीने दो’ हा संदेश संपूर्ण जगाला दिला. याच अनुषंगाने या दिवशी शहरातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सर्वधर्मीय नागरिकांचे वास्तव्य आहे. जैन बांधवही या शहरात मोठ्या संख्येने असून ते गुण्या गोविंद्याने राहत आहेत. सर्व समाजबांधव आपआपले सण-उत्सव साजरे करतात. त्यामुळे जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या महावीर जयंतीनिमित्त सर्व समाजबांधवांनी एकोपा दाखवला पाहिजे.
जैन बांधवांचा विचार केला पाहिजे
ब्रिटीश काळापासून महावीर जयंतीला देशातील कत्तलखाने बंद ठेवले जात होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातले सर्व कत्तलखाने महावीर जयंतीला सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. मात्र, तरीही जैन बांधवांच्या भावनांचा विचार करुन सर्व समाज बांधवांनी मांस विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवावे. त्याबाबत महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन संबंधित विक्रेत्यांना आवाहन करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
दरम्यान, पिंपरी- चिंचवड जैन महासंघाने भगवान महावीर जयंतीनिमित्त दि. 23 मार्चपासून 29 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कासारवाडी येथील पगारिया सभागृहात अहिंसा सप्ताह व नवकार महामंत्र जपाने उत्सवाचा शुभारंभ झाला. दि. 29 रोजी दिगंबर जैन मंदिर निगडी अरिहंत व जैन मंदिर चिंचवड, रामस्मृती लॉन्स भोसरी येथे रक्तदान व नेत्रदान शिबिर, मोहननगर येथे जैन वसतिगृह व मोरया मंदिर परिसरातील समरथ संस्था गुरुकुल येथे फळ वाटप होणार आहे. तसेच, दि. 29 मार्चला महावीर जयंतीच्या मुख्य दिवशी दुपारी चार वाजता निगडी येथे जैन मंदिरात अहिंसा रॅली व अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे सायंकाळी सहा वाजता समारोप होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जैन महासंघाचे अध्यश वीरेंद्र जैन यांनी केले आहे.