अहिंसेसाठी देखील क्रांतीची गरज असते : आचार्य बालकृष्ण

0

पुणे । तुमचा संकल्प, तुमचे लक्ष्य तुम्हाला स्वत:लाच पूर्ण करावे लागते. त्यासाठी दुसरा कोणी येणार नाही. दुखर्‍या बाजू आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करतात. हे टाळण्यासाठी अध्यात्माचा आधार घ्यावा. अधात्म्य आपल्याला अहिंसा शिकविते पण शेवटी अहिंसेसाठी देखील क्रांतीचीच गरज असते, असे मत हरीद्वार येथील पतंजली योगपीठाचे सहसंस्थापक आणि पतंजली आयुर्वेद लि. चे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी व्यक्त केले.

डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरु डॉ. जय गोरे, पतंजली योगपीठाचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य रामकुमार राठी, हरिभाई शाह, पद्मभूषण हाफीज कॉन्ट्रॅक्टर, प्रा. आपटे याप्रसंगी उपस्थित होते.

विकृतींपासून दूर रहा
आपला देश प्रतिभा संपन्न आहे. येथे विकृती असणारेही लोक आहेत. शेवटी आपणच ठरवायचे की, आपण कशाचा स्वीकार करायचा. आपले जीवन हे एका इमारतीसारखे असते. या इमारतीमध्ये अडचण किंवा विकृतीरुपी एखादी वीट असते जी तुमची संपूर्ण इमारत ढासळण्यासाठी कारणीभूत होऊ शकते. त्यामुळे आयुष्यात अशा विटा राहणार नाहीत, याची काळजी घ्या, असा सल्ला आचार्य बालकृष्ण यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

अध्यात्माचा आधार घ्या
दान करणे ही आपली संस्कृती आहे. स्व-सामर्थ्याच्या जोरावर आपण समाजाला काहीतरी देण्यासाठी झटले पाहिजे. जगाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रतिकूलतेचा सामना करण्यासाठी सहनशीलता, धैर्य हे गुण आवश्यक आहेत. मात्र, हे गुण कोणत्याही पाठ्यपुस्तकात शिकविले जात नाहीत. त्यासाठी अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो, असे आचार्य बालकृष्ण यांनी पुढे सांगितले.

वैश्विक शिक्षणपद्धतीची गरज
विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयानेच विश्वशांती नांदेल. हे स्वामी विवेकानंदांचे वचन शिरोधार्य मानून मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षणपद्धतीची जगाला गरज आहे, असे प्रा. डॉ. कराड यांनी सांगितले. प्रा. राहुल कराड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचलन तर प्रा. डी. पी. आपटे यांनी आभार मानले.