अहिराणीचा प्रसार हाच खान्देशी भाषिकांचा सन्मान : योगेश कुलकर्णी

0

23 नोव्हेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

पिंपरी : वेद पुराणात अहिराणी भाषेची नोंद आहे. त्याकाळी मोठ्या प्रमाणात बोलीभाषा म्हणून अहिराणीचा वापर होत असे. परंतु, आजच्या आधुनिक युगात या भाषेचा वापर कमी झाला असून फक्त महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक शहरातील ग्रामीण भागात अहिराणी भाषा परिचित आहे. जगाच्या पाठीवर अहिराणी भाषेचा प्रचार, प्रसार होणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, तोच खान्देशचा सन्मान ठरेल, असे प्रतिपादन अहिराणी भाषेतील मोल चित्रपटाचे निर्माते योगेश कुलकर्णी यांनी केले. खान्देश सांस्कृतीक विकास संस्थेमार्फत रविवारी खान्देश मराठा मंडळाच्या सभागृहात मोल चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

तत्पूर्वी, कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्याहस्ते झाले. यावेळी उद्योजक तथा जनशक्ति वृत्तपत्राचे संपादक कुंदन ढाके, नगरसेवक नामदेव ढाके, पारस बाविस्कर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली बाविस्कर, चित्रपटातील कलाकार रंजन खरोटे, खान्देश मित्रमंडळाचे अध्यक्ष हिरालाल पाटील, साहेबराव जाधव,गगनगिरी विश्‍व फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेखा भोळे, शशीकांत पाटील, विजय पाटील, पंकज निकम, किरण वाणी, देविदास पाटील, लोकमान्य श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष रविंद्र महाजन, मोतीलाल पाटील, सुरेश पाटील, उद्योजिका मनिषा पाटील, खान्देश युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर पाटील, समता भ्रातृमंडळ उपाध्यक्ष घनशाम जावडे, जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळ उपाध्यक्ष मधुकर पाचपांडे, लेवा पाटीदार मित्र मंडळ कार्याध्यक्ष एल.झेड. पाटील, उद्योजिका उज्वला चौधरी यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

अहिराणी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये निर्माता योगेश कुलकर्णी यांनी मोल चित्रपटाची निर्मीती केली आहे. रविवारी या चित्रपटाच्या प्रमोशनचा कार्यक्रम पार पडला. खान्देश भागातील कलाकार या चित्रपटात असून खान्देश चालीरीती, प्रथा, अहिराणी भाषेचे संर्वधन, व्यसनमुक्ती आदी गोष्टीचे समाज प्रबोधनात्मक माहिती या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट 23 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून प्रत्येक अहिराणी व खान्देश भागातील व्यक्तीने चित्रपट आवर्जुन बघावा, असे आवाहन कुलकर्णी यांनी यावेळी केले.

213 व्या एकपात्री नाट्यप्रयोगाने घडविले अहिराणीचे दर्शन…

संगीतकार श्याम क्षिरसागर यांनी ‘मोल’ चित्रपटातील ‘आम्ही मेंढर मेंढर‘ हे गीत सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. प्रसंगी, खान्देश सांस्कृतीक विकास संस्थेमार्फत प्रविण माळी (सर) यांनी अहिराणी भाषीक ‘आयतं पोयतं सरण्यानं‘ हे एकपात्री विनोदी नाट्य प्रयोग प्रेक्षकांसमोर सादर केला. त्यांनी 213 व्या नाट्य प्रयोगातून अहिराणी भाषेतील नाती गोती, कुटुंबातील गमतीदार भांडणे, विविध सोहळ्यांची गमतीदार मांडणी यासह विविध समाज प्रबोधनात्मक विषय मांडून तब्बल दोन तास अहिराणी भाषेचे दर्शन घडवून आणले. प्रथम अहिराणी चित्रपट ’सटीना कटाक’ या चित्रपटाचे निर्माते स्व. दत्ताराम सखाराम चिंचोले यांच्या स्मरणार्थ प्रवीण माळी (सर) यांचे एकपात्री नाट्य प्रयोग खान्देश मराठा मंडळ, प्राधिकरण येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अहिराणी भाषिकांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्नशिल…

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले. त्यांनी संस्थेच्या कार्याची माहीती देऊन अहिराणी भाषीक समाज बांधवांना एकत्र आणून त्यांच्या सुख दुःखात संस्थेचे सर्व पदाधिकारी सहभागी होतात. त्यांच्या अडी-अडचणी सोडवून पाल्यांना विवाह जुळविण्याची संस्थेमार्फत मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले.

संस्थेचे सचिव महेंद्र पाटील यांनी सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. त्यानंतर सर्वांनी खान्देशी भोजनाचा आश्‍वाद घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण चौधरी,पी. आर. पाटील, भरत चित्तेे, गणेश राजपूत, राम पाटील, शिवाजी पाटील, सचिन महालेख, गौतम बागुल, दिपक कापडे, साहेबराव देसले, राहूल सोनवणे, किशोर पाटील, नितीन जाधव, जगन्नाथ पवार आदींचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन जितेंद्र चौधरी व भानुप्रिया पाटील यांनी केले.