अहिराणी बोलीभाषेचे संवर्धन होणे गरजेचे
ज्येष्ठ महिला अहिराणी साहित्यिका विमल वाणी यांचे प्रतिपादन
निगडी : खान्देशी अहिराणी बोलीभाषेचे संवर्धन होणे गरजेचे आहे. या संवर्धनाच्या कार्यात महिलांचा पुढाकार म्हणजे निश्चितच समाधानकारक बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ महिला अहिराणी साहित्यिका विमल वाणी यांनी केले. खान्देश सांस्कृतिक विकास संस्थेच्या वतीने निगडीतील पाटीदार भवनात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय प्रथम अहिराणी महिला साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना त्या बोलत होत्या.
खान्देशावासीयांनी पुढाकार घ्यावा
अहिराणी बोलीभाषेच्या संवर्धनासाठी खान्देशवासीयांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यातूनच अहिराणीचे संवर्धन केले जाऊ शकते. पुढच्या पिढीपर्यंत अहिराणी बोलीभाषा पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. महिलांनी निर्भीडपणे प्रत्येक परिस्थितीचा सामना करायला हवा. त्यांनी सक्षम व्हायला हवे. या साहित्य संमेलनातून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे, असे मतही विमल वाणी यांनी व्यक्त केले.
अहिराणी महिला संमेलन हा स्तुत्य उपक्रम
या संमेलनाच्या उद्घाटक धुळ्याच्या महापौर कल्पना महाले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अहिराणी महिला संमेलन हा स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे अहिराणी महिला साहित्यिकांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यांच्याकडून अहिराणी बोलीभाषेच्या संवर्धनासाठी मोलाची कामगिरी घडेल, असे त्या म्हणाल्या. या संमेलनाच्या प्रथम सत्रात अहिराणी साहित्य आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारी ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. ही दिंडी पाटीदार भवनापासून ते हुतात्मा चौकापर्यंत काढण्यात आली. दिंडीमध्ये महिलांनी जळगावचे दैवत असणार्या कानुबाई, गौराई व गुलाबाई आदी देवींच्या प्रतीकात्मक मूर्ती डोक्यावर घेऊन त्यांची मिरवणूक काढली होती.
ग्रंथदिंडीनंतर संमेलनाचे उद्घाटन
ग्रंथदिंडीचा समारोप झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. विमल वाणी यांनी अध्यक्षपद भूषविले. सामाजिक कार्यकर्त्या योगिता काळभोर यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले. काळभोर यांनी अहिराणी बोलीभाषा व महिला सक्षमीकरण या विषयासंदर्भात महिलांशी संवाद साधला.
काव्यसंमेलनाने आणली दुसर्या सत्रात रंगत
या संमेलनाच्या दुसर्या सत्रात काव्यसंमेलन घेण्यात आले. सारिका रंधे या दुसर्या सत्राच्या अध्यक्षा होत्या. मंगला रोकडे, इंदिरा महाजन, सारिका रंधे, विमल पाटकरी, शोभा जाधव व अनुराधा धोडगे आदींनी कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. रत्ना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथनात वृषाली खैरनार, लतिका चौधरी, प्रतिभा ठाकूर व रत्ना पाटील यांनी सहभाग घेतला.
कर्तबगार महिलांचा पुरस्काराने गौरव
या संमेलनाला महापौर शकुंतला धराडे, संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे, सचिव महेंद्र पाटील, सहसचिव पांडुरंग पाटील, खजिनदार देवयानी पाटील, गणेश राजपूत, भरत चित्ते, मीना चिंचोले, प्रियंका ठाकूर, ज्योत्स्ना पाटील, हेमलता पाटील, शकुंतला चव्हाण, वृषाली खैरनार, शोभा जाधव यांच्यासह खान्देशवासीयांची उपस्थिती होती. मीना भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संमेलनात विशेष कामगिरी करणार्या व जिद्दीने कठीण परिस्थितीशी सामना करत यश मिळवणार्या खान्देशी महिलांना कर्तबगार महिला व हिरकणी पुरस्काराने गौरविण्यात आले. कर्तबगार महिला म्हणून लिलाबाई पाटील, रुपाली पाटील, शोभा पटांगळे, मीना भोसले, मंगला रोकडे व प्रमिला ऐरे या होतकरू महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शोभा जाधव, सारिका रंधे, मंगला रोकडे, लतिका चौधरी, रत्ना पाटील यांना विशेष कामगिरी केल्याबद्दल खान्देश हिरकणी पुरस्काराने गौरविण्यात आले. महाले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक, एकापेक्षा एक सरस साहित्य कलाकृतींनी युक्त या संमेलनात अहिराणी साहित्य व संस्कृतीचे दर्शन घडले.