मुंबई (निलेश झालटे): हालाखीच्या परिस्थितीत ‘कमवा व शिका’ अंतर्गत डिप्लोमाचे शिक्षण घेत असताना पगारातून कपात केलेल्या अवघ्या एक हजार रुपयांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील एक विद्यार्थी मंत्रालय आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवत आहे. तक्रारीसाठी दिलेल्या मेलवर तक्रार मेल करून देखील उत्तर मिळत नसल्याचे या विद्यार्थ्याने विनोद तावडे हे विद्यार्थ्यांना त्रास देत असून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. १००० रुपयांच्या मागणीसाठी गडचिरोली वरून आलेल्या निखील येनगुंटीवार या विद्यार्थ्याचे आतापर्यंत १८०० रूपए खर्च झाले असून हे पैसे परत मिळावे या मागणीसाठी तो चार दिवसापासून मंत्रालयात खेटे घालत आहे.
विनाअनुदानित विद्यापीठाच्या अंतर्गत डिप्लोमा इन मेकनिकल इंजिनियर करणाऱ्या गडचिरोलीतील एका खेड्यातून आलेल्या निखिलने मंत्रालयात आपली आपबिती सांगितली. पैसे संपले असल्याने दोन दिवसापासून उपाशी असल्याचे त्याने सांगितले. ज्या कॉलेजमध्ये तो शिकायचा. तिथे कमवा शिका योजनेतून त्याला ५ हजार रुपए मिळायचे. मात्र कॉलेजने त्याचे एक हजार रुपए कपात करून घेतल्याने तो संतप्त झाला आणि सरळ शिक्षणमंत्र्यांनाच मेलद्वारे तक्रार केली. मात्र या मेलला कुठलेही उत्तर न मिळाल्याने निखिलने मुंबई गाठली. निखिलने सांगितले की, चार दिवसांपूर्वी तो मुंबईत आला आहे. त्याच्याजवळचे पैसे प्रवासात आणि खाण्यासाठी खर्च झाले असल्याने तो दोन दिवसापासून उपाशी होता असे त्याने सांगितले.
यावेळी निखिलने शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप केला. ज्या ठिकाणी तो शिक्षण घेत होते तिथे ‘कमवा शिका’ योजनेत ४ तास कामाचा नियम असताना १० तास काम करून घेतले जायचे असेही त्याने सांगितले. ३ वर्षाचा हा कोर्स क्लास होत नसल्याने त्याने अर्ध्यातून सोडले असल्याचे निखिलने सांगितले. काम करूनही पैसे न मिळाल्याने शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागितली. मात्र त्याला शिक्षणमंत्र्यांचे कार्यालय ते बंगला तसेच या अधिकाऱ्यांकडून त्या अधिकाऱ्याकडे चकरा माराव्या लागल्या असल्याचे निखील म्हणाला. आमदार निवासात आसरा घेतलेल्या निखिलचे आता पैसे संपले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई देण्याची मागणी तावडे यांच्याकडे केली आहे.