अॅथलेटिक्स वर आधारित ‘रे राया… कर धावा’ येतोय २० जुलैला

0

पुणे-मराठीत आतापर्यंत खेळावर आधारित चित्रपट अपवादाच झाले. त्यातही अॅथलेटिक्स हा प्रकार तर आणखी दुर्लक्षित. ही कसर भरून काढण्यासाठी मिलिंद शिंदे दिग्दर्शित ‘रे राया… कर धावा’ हा चित्रपट २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.

अभिनेता भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, प्रकाश धोत्रे, सुदर्शन पाटील यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विवेक चाबुकस्वार, हंसराज जगताप यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांचा धावपटू होण्याचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. भूषण प्रधान अॅथलेटिक्स प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाविषयी दिग्दर्शक मिलिंद शिंदे म्हणाले, ‘ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये दैवदत्त क्षमता असतात. मात्र, त्या क्षमतांना योग्य दिशा देण्याची गरज असते. योग्य दिशा मिळाल्यावर मुले फार मोठी मजल मारू शकतात. अतिशय वास्तववादी पद्धतीने हा चित्रपट हाताळला आहे. स्पोर्ट्स फिल्म हा अवघड प्रकार असतो. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक वेगळा विषय, वेगळे विश्व अनुभवायला मिळेल.’ ‘चित्रपट दिग्दर्शित करताना मी माझ्यातल्या अभिनेत्यापासून पूर्णपणे अलिप्त होतो. दिग्दर्शक म्हणून स्वतंत्रपणे या चित्रपटाचा विचार केला. कुठल्याच अभिनेत्याला मला काय हवंय हे करून दाखवलं नाही. प्रसंग, संवाद, त्यांची व्यक्तिरेखा, शब्दांत दडलेला अर्थ त्यांचा त्यांना शोधू दिला. म्हणूनच या चित्रपटातील अभिनय नैसर्गिक आणि वास्तववादी झाला आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.