नवापूर : शहरालगत लहान चिंचपाडा परिसरात प्रवासी अॅपे रिक्षा उलटल्याने रिक्षातील 18 प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. गंभीर जखमी झालेल्या 4 जणांना उपचारार्थ नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षितता सप्ताहात हा अपघात घडल्याने अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील सोनखडके शिवारात ऊसाची तोड सुरू असून धडगाव तालुक्यातील कार्ली, खिडक्या, सौंद व कुवरखेत येथील मजूर कार्यरत आहेत. बाजार करण्यासाठी एका अॅपे रिक्षाने मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमाराला 18 जण नवापूरला येत असतांना वळणावर हा अपघात झाला.
त्यात अंतरसिंग वळवी(30), गुलाबसिंग वळवी (23), संजय वळवी (25), सुनिता वळवी(24), वर्षा पाडवी (7), वंता पाडवी (25), किसन वसावे (17), टेट्या वळवी (20), किशाबाई वळवी(28), लोटून वळवी (45), रोहिदास वळवी (15), हे जखमी झाले आहेत. टेट्या वळवी, किशाबाई वळवी, लोटन वळवी व रोहिदास वळवी या गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐन रस्ता सुरक्षितता सप्ताहात अवैध प्रवासी वाहतुकीचा हा अपघात घडल्याने पोलीस प्रशासनाची अकार्यक्षमता अधोरेखित झाली आहे. तथापि या बाबत नवापूर पोलीसात सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही नोंद नव्हती.