अ‍ॅक्झोन ब्रेन रूग्णालयाची कोविड उपचाराची मान्यता निलंबीत

जिल्हा शल्य चिकीत्सकांनी काढले आदेश

जळगाव – शहरातील महामार्गालगत असलेल्या डॉ. निलेश किनगे यांच्या अ‍ॅक्झोन ब्रेन हॉस्पीटलची कोविड उपचाराची मान्यता निलंबीत करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकीत्सक तथा नोडल अधिकारी डॉ. एन.एस. चव्हाण यांनी आज दिले. तसेच नव्याने कोविड रूग्ण दाखल करण्यात येऊ नये असेही
आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील मेंदू व मणका विकार तज्ञ असलेले डॉ. निलेश किनगे यांच्या अ‍ॅक्झोन ब्रेन रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार केले जात होते. या रूग्णालयात दाखल होणार्‍या रूग्णांकडुन अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. तसेच सोशल मीडीयाच्या माध्यमातूनही डॉ. किनगे यांच्या रूग्णसेवेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान जिल्हा रूग्णालयाच्या भरारी पथकाने रूग्णालयास भेट देऊन तपासणी केली. या तपासणीत अनेक गंभीर बाबी आढळुन आल्या. त्यानुसार जिल्हा शल्यचिकीत्सक तथा नोडल अधिकारी डॉ. एन.एस. चव्हाण यांनी डॉ. निलेश किनगे यांच्या अ‍ॅक्झोन ब्रेन रूग्णालयातील कोविड उपचाराची मान्यता निलंबीत करण्याचे आदेश दिले.
अशा आहेत गंभीर बाबी
दि. १७ जानेवारी रोजी रूग्णालयाची मान्यता रद्द केलेली असतांना डॉ. किनगे यांनी दि. १७ जानेवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान रूग्ण उपचारासाठी दाखल करून घेतले. तसेच रूग्णालयास १५ बेडची परवानगी असतांना २४ रूग्ण दाखल केल्याचे आढळुन आले. रूग्णालयातील डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी हे पीपीई किट परिधान न करताच रूग्णांना सेवा दिल्याचे आढळुन आले. रूग्णालयात ऑक्सीजनचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होतांना दिसून आले. अशा गंभीर बाबींमुळे डॉ. किनगे यांच्या रूग्णालयाची कोविड-१९ ची मान्यता पुढील आदेशापर्यंत निलंबीत करण्यात आली आहे. तसेच दाखल असलेले रूग्ण यांना नियमानुसार रूग्णालयातून सुटी देण्याची कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यता आल्या आहे. असे न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही डॉ. किनगे यांना देण्यात आला आहे.