मुंबई : इलेक्ट्रोपॅथी, अॅक्युपंक्चर या उपचार पद्धतींच्या मान्यतेबाबत अद्याप वाद असतानाही शासकीय संस्थांमध्ये सुरू असलेले या विषयांचे पदविका अभ्यासक्रम अखेर बंद करण्यात आले आहेत. त्याऐवजी आता महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाकडून या विषयांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवण्यात येणार आहेत.
एमबीबीएस, बीएएमएस या आणि यांसारख्या मान्यताप्राप्त पदव्या घेतलेल्या डॉक्टरांसाठी वर्षांचा पदविका अभ्यासक्रम अनेक संस्थांकडून चालवण्यात येत होता. हा अभ्यासक्रम यंदापासून रद्द करण्यात आला आहे. आता या विषयांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना परवानगी देण्यात आली असून त्यासाठी बारावी ही पात्रता आहे. त्याचप्रमाणे हे अभ्यासक्रम केलेल्या व्यक्तींना स्वतंत्रपणे व्यवसाय करता येणार नाही तर साहाय्यक म्हणून काम करता येणार असल्याचेही व्यवसाय शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
इलेक्ट्रोपॅथी, अॅक्युपंक्चर या उपचार पद्धती आणि त्यांची मान्यता अद्याप वादात आहेत. मात्र तरीही अनेक शासकीय मान्यता असलेल्या व्यवसाय शिक्षण संस्थांमधून या उपचार पद्धतींचे पदविका अभ्यासक्रम चालवण्यात येत होते. महाराष्ट्र राज्य व्यावसायिक शिक्षण मंडळाकडून या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली होती. वैद्यकीय पूरक अभ्यासक्रम (पॅरामेडिकल) म्हणून या अभ्यासक्रमामध्ये या दोन उपचारपद्धतींची गणती करण्यात आली आहे.