पुणे । येथील दाऊदी बोहरा कम्युनिटीच्या वतीने आयोजिलेल्या ‘अॅडव्हेंचरथॉन’ या साहसी क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद बंगळुरू संघाने पटकावले. पुण्याच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गोळीबार मैदानावर झालेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.सईदना मोहम्मद बुर्हानुद्दीन यांच्या 107व्या व मुफद्दल सैफुद्दीन यांच्या 74 वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धा घेण्यात आल्या. देशभरातील 12 संघांनी यात सहभाग घेतला होता. त्यामध्ये पुणे, नाशिक, देवळाली, बंगळुरू, मुंबई, कोईमतूर, बार्शी, सुरत या संघांचा समावेश होता. सायकलिंग, क्लायंबिंग, रॅपलिंग, पुलिंग, अडथळ्यांची शर्यत, पोहणे, दोरीवरून चालणे, भिंत चढणे अशा विविध साहसी खेळांनी स्पर्धकांनी उत्कंठा वाढवली. त्यातून क्षमता, साहस, कौशल्य, टीम वर्कचे दर्शन घडले.
‘अॅडव्हेंचरथॉन’चे उद्घाटन दाऊदी बोहरा कम्युनिटीचे प्रमुख जनाब अब्देअल्ली नुरुद्दीन, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.एन. यादव, उपाध्यक्ष अतुल गायकवाड, सदस्य मथुरावाला व किरण मंत्री, अभिनेता नंदीश संधू, युनिटी इन्फिनिटीचे संचालक शब्बीर फर्निचरवाला, जोहेर हर्नेसवाला आदी उपस्थित होते.
अशा प्रकारच्या स्पर्धांतून एकात्मता, बंधुभाव आणि साहसाचे दर्शन होते. अडथळ्यांच्या वाटेवरून चालताना येणारी संकटे दूर कशी करावीत, यासाठी प्रेरणा मिळते. स्पर्धकांनी सादर केलेली प्रात्यक्षिके पाहून ‘खतरों के खिलाडी’मधील माझे दिवस पुन्हा एकदा मला अनुभवायला आले, अशा शब्दांत नंदीश संधू याने भावना व्यक्त केली.