अ‍ॅड. मिडगे यांना एलएलडी पदवी

0

राजगुरुनगर (प्रतिनिधी) – राजगुरुनगर येथील मूळचे रहिवासी ख्यातनाम विधिज्ञ व व्यवस्थापन सल्लागार अ‍ॅड. बाळासाहेब गोविंद मिडगे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले. या संशोधनाबद्दल अ‍ॅड मिडगे यांना एलएलडी पदवी प्रदान करण्यात आली.

नुकत्याच मुंबई येथे ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लिमेंटरी मेडिसीन, यु. एस. एस. आर. व श्रीलंकेच्या (येनेस्को) वतीने पार पडलेल्या जागतिक परिषदेत एक बाळकृष्ण मिडगे यांना एलएलडी पदवी देऊन गौरविण्यात आले. ’भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान, वेदांत व कायदा’ या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. आपल्या संशोधनात भारतीय राज्यघटनेच्या तत्वज्ञानाचे वेदांत हे मूलभूत अधिष्ठान असून वेदांतावर राज्यघटनेचा अर्थ लावणे ही पाश्‍चात्य तत्वज्ञान व संस्कृतीने ग्रासलेल्या आजच्या समाजाची गरज असल्याचे अ‍ॅड मिडगे यांनी संशोधन केले आहे. थेरी ऑफ कॉन्स्टिट्युशनल इंजिनिअरिंग हा सिद्धांत त्यांनी आपल्या संशोधनात मांडला आहे.

न्यायव्यवस्था विकसीत होऊ शकते
भारतीय तत्वज्ञान, संस्कृती व तिचा वारसा या आधारावर राज्यघटनेचा अर्थ लावण्यात आला तर मानवतावादी, कल्याणकारी राज्य व न्यायव्यवस्था विकसीत होऊ शकते हे डॉ. बाळकृष्ण मिडगे यांनी आपल्या संशोधनात पटवून दिले आहे. योग विषयातही त्यांनी काही सिद्धांत मांडले असून ते सिद्धांतही गाजले आहेत. दरम्यान, अ‍ॅड. मिडगे यांच्या यशाबद्दल त्यांचे खेड तालुक्यातून तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून अभिनंदन होत आहे.