अ‍ॅड.रोहिणी खडसेंच्या पराभवामुळे भुसावळात विजय रॅलीसह आतषबाजीला फाटा

0

आमदार सावकारेंच्या निवासस्थानी कुटुंबीयांनी केला जल्लोष : मतमोजणी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी दिल्या आमदारांच्या विजयाच्या घोषणा

भुसावळ- भुसावळ विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार संजय सावकारे यांनी पहिल्या फेरीपासुनच आघाडी घेतल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सावकारे मतांमध्ये आघाडी घेत असल्याने त्यांच्या निवासस्थानी कुुटुंबीयांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांचा पराभव झाल्याने आमदार संजय सावकारे यांची काढण्यात येणारी विजयी रॅली व फटाक्यांच्या आतीषबाजीला पूर्णविराम देण्यात आला. दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवलेल्या डॉ.मधू राजेश मानवतर यांच्यासह इतर उमेदवारांच्या निवासस्थानी मात्र शुकशुकाट दिसून आला.

सावकारे कुटुंबाने केला जल्लोष
भुसावळ विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार संजय सावकारे यांनी पहिल्या फेरीपासुनच मतांची आघाडी घेत ही एकतर्फी विजयश्री खेचून आणल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार सावकारे यांनी या निवडणुकीत विजय मिळवून हॅटट्रिकची संधी साधल्याने त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या आई व पत्नीसह सर्वच कुटुंबीयामध्ये उत्साहाचे निर्माण झाले. सावकारे हे मतांमध्ये आघाडी घेत असल्याचे दिसताच कुटुंबातील महिला सदस्यांनी निवासस्थानासमोर रांगोळी काढून जल्लोष करण्यात आला तर आमदार विजयी होवू घरी येताच त्यांनी आई सुशीलाबाई सावकारे यांचे आशीर्वाद घेतले प्रसंगी त्यांचे औक्षणही करण्यात आले. दुसरीकडे दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवणारे अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर यांच्या निवासस्थानी व रुग्णालयात शांतता दिसून आली. याचप्रमाणे इतर अपक्ष उमेदवारांच्या निवासस्थानीही शांततेचे वातावरण निर्माण झालेले दिसून आले. आमदार सावकारे यांनी या निवडणुकीत मतदानामध्ये आघाडी घेतल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी 11 व्या फेरीलाच मिरवणुकीसाठी वाहन सजवण्याला सुरूवात केली होती. तसेच मतमोजणी केंद्र परीसरात कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्यांच्या गजरावर ठेका धरला.

मुक्ताईनगरातील पराभवाने आतषबाजी थांबवली
भुसावळात आमदार विजयाच्या समीप पोहोचल्यानंतर दुसरीकडे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील निकालाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. पदाधिकारी व कार्यकर्ते मुक्ताईनगर मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल चुरशीचा होत असल्याने वारंवार सोशल मिडीयावर अपडेट जाणून घेत होते. दुपारी तीन वाजेदरम्यान मुक्ताईनगर मतदारसंघातील अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांमध्ये निरूत्साहाचे वातावरण निर्माण होवून विजयी रॅली, ढोल-ताशे व फटाक्यांच्या आतीषबाजीला पुर्ण विराम देण्यात आला तसेच मतदान केंद्र परीसरात आणलेले सजवलेले वाहनही माघारी पाठवण्यात आले.

कार्यकर्त्यांच्या परीश्रमाचे फळ
आमदार सावकारे यांची विजयाकडे आगेकुच सुरू असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयातील महिला सदस्यांनी निवासस्थानासमोर रांगोळी काढुन जल्लोष सुरू केला. यावेळी आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी हा विजय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रात्र-दिवस परीश्रम घेतल्यामुळेच सहज शक्य झाला. यामुळे हे सर्व श्रेय पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांचे असून या निवडणुकीसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना सांगितले.

कार्यकर्त्यांनी उशिरा गाठले मतमोजणी केंद्र
मतमोजणीच्या दिवशीही पावसाने सकाळपासून हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांनी पावसाच्या विश्रामानंतर दहा वाजेदरम्यान मत मोजणी केंद्र गाठण्यास सुरूवात केली होती तसेच काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावरूनच निकाल जाणून घेतला यामुळे मतदान केंद्रालगत कार्यकर्त्यांची फारसी गर्दी दिसून आली नाही तसेच अनेकांनी आमदार सावकारे यांचा विक्रमी मताधिक्यांनी विजय होणार असल्याची चिन्हे दिसू लागताच आपले लक्ष मुक्ताईनगर विधानसभेच्या निकालाकडे केंद्रीत केले होते. यामुळे या परीसरात मुक्ताईनगर मतदारसंघाच्या निकालावर चर्चा होतांना दिसत होती तसेच काहींचे लक्ष रावेर विधानसभा मतदार संघाकडेही लागले होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मतमोजणी दरम्यान शहरात अशांतता निर्माण होवू नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान केंद्र परीसरातील प्रभाकर हॉलकडे जाणारा मार्ग दोन ठिकाणी बॅरीकेटस् लावूण पूर्णतः बंद करण्यात आला होता. या ठिकाणाहून केवळ मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधी, उमेदवार व पत्रकारांना ओळखपत्रांची तपासणी करूनच सोडले जात होते तर जळगाव मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती तसेच उमेदवारांच्या निवासस्थानाकडेही पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजनात समावेश करण्यात आला होता. यामुळे कुठेही अनुचित प्रकार घटना घडली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

विरोधक उमेदवार फिरले माघारी
मतमोजणी दरम्यान आपला पराभव होत असल्याचे दिसून येताच काही उमेदवारांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. यामध्ये डॉ.मधू मानवतकर व त्यांचे पती डॉ.राजेश मानवतकर यांनी अतिदक्षता विभागात रुग्ण आल्याचे सांगून मतदार केंद्रातून रुग्णालयाकडे धाव घेतली मात्र त्यांचे रुग्णालय व रुग्णालय लगतच्या निवासस्थानी शांतता दिसून आली. विद्यमान आमदार संजय सावकारे व त्यांचे मतमोजणीसाठी नियुक्त केलेले प्रतिनिधी मतमोजणी केंद्रांमध्ये अखेर पर्यंत तळ ठोकून होते तर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतमोजणी केंद्रांबाहेर थांबून जल्लोष साजरा करतांना दिसून आले.

रीक्षामध्ये आणलेला गुलाल नेला परत
विजयी रॅली दरम्यान गुलांलाची उधळण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रीक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गूलाल आणून ठेवला होता मात्र मुक्ताईनगरात पराभव झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याने आणलेला गुलाल परत नेण्यात आला व कुठल्याही प्रकारचा जल्लोष न करता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार संजय सावकारे यांना शुभेच्छा देवून आपापले निवासस्थान गाठले.