नंदुरबार । जगभरात कोरोना या अदृश्य महामारीने थैमान घातले असताना भारतात त्याचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत संचारबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे हे प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक झाले आहे. पोलीस, महसूल, डॉक्टर, सफाई कर्मचारी, विविध शासकीय अधिकारी, सेवाभावी कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करीत आहे. यात नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या 20 लाखाच्या घरात आहे. त्यात जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची संख्या केवळ 1 हजार 658 इतकीच आहे. सध्याच्या स्थितीत केवळ 1 हजार 374 पोलीस सेवेत कार्यरत आहे. परिस्थिती लक्षात घेता आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी अॅन्टी कोविड फोर्सची स्थापना केली आहे. या फोर्समध्ये सेवाभावी कार्यकर्ते यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे.