अ‍ॅपमधून शहिदांच्या कुटुंबीयांना कोटींची मदत

0

नवी दिल्ली । कर्तव्य बजावताना शहीद होणार्‍या अर्धसैनिक दलाच्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी बनवलेल्या भारत के वीर अ‍ॅपला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आतापर्यंत आठ कोटी रुपयांची आर्थिक मदत शहीदांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे अ‍ॅप, वेबसाइट लाँच होऊन अवघे दोन महिने झाले आहेत.भारत के वीर अ‍ॅप, वेबसाइटच्या माध्यमातून सामान्य माणसापासून अनेक संघटनांनी शहीदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी हातभार लावला आहे. गृह मंत्रालयातील एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 7 कोटी 93 लाख, 90 हजार, 858 रुपये देणगी देण्यात आली आहे. ही रक्कम शहीदांच्या कु टुंबियांना देण्यात आली आहे. या अ‍ॅप, वेबसाइटद्वारे देण्यात येणारी मदत थेट शहीदांच्या कुटुबियांच्या बँक खात्यात जमा होते.

अक्षयने केले आवाहन
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील गुरुवारी एका व्हिडिओद्वारे नागरिकांनी जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी हातभार लावण्याचे आव्हान केले होते. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अ‍ॅप, वेबसाइट असावी अशी कल्पना केंद्र सरकारकडे मांडली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात भारत के वीर ही वेबसाइट आणि अ‍ॅप लाँच करण्यात आले होते. देशभरातून या अ‍ॅप आणि वेबसाइटला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच मदतीसाठी आर्थिक निधी उभारण्यात येत असलेल्या या उपक्रमात तरूणाई देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.