अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव सुरू!

0

मुंबई : सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहाच्या लोणावळा येथील अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव सुरू झाला आहे. 67 हजार 621 एकर जागेवरील अ‍ॅम्बी व्हॅलीतील मालमत्तेची एकूण किंमत 34 हजार कोटी निश्चित करण्यात आली असून लिलावाची बोली 37, 392 कोटीपासून सुरू करण्यात आली आहे.

लिलावाची नोटीस प्रसिद्ध
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली असून मुंबई उच्च न्यायलयाने अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. लोणावळा येथील 67 हजार 621 एकर जागेवर उभारण्यात आलेल्या अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलावासाठी राखीव किंमत 37 हजार कोटी रुपये निश्चित केली आहे.

न्यूयॉर्कमधील मालमत्तेची लवकरच विक्री
लिलावाला स्थगिती द्यावी अशी मागणी सहारा समूहाने याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली होती ती मागील आठवड्यात फेटाळून लावली होती. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी सहाराच्या बाजूने बाजू मांडली. या लिलावाला 16 सप्टेंबरपर्यंत स्थगिती द्यावी, अशी मागणी सिब्बल यांनी केली होती. सहाराच्या न्यूयॉर्कमधील मालमत्तेची विक्री लवकरच होणार असून 7 सप्टेंबरपर्यंत समूहाला 1,500 कोटी रुपये सेबीकडे जमा करता येतील, असा दावा सिब्बल यांनी कोर्टात केला होता. मात्र लिलाव प्रक्रिया स्थगित केली तर 1,500 कोटी रुपये देण्याचे आश्वासन कसे पूर्ण कराल, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने सहाराला विचारला होता. 7 सप्टेंबरपर्यंत 1,500 कोटी रुपये सेबी-सहाराच्या बँक खात्यात जमा केल्यास याचिकेवर योग्य तो निर्णय नंतर दिला जाईल, असे न्या. दीपक शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिले होते. न्या. मिश्रा यांच्या खंडपीठाने याआधीच अ‍ॅम्बी व्हॅलीच्या विक्रीसाठी असलेल्या नियम आणि अटींना मंजुरी दिली होती.

1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्य
दरम्यान, मॉरिशसमधील रॉयल पार्टनर्स इन्वेस्टमेंट फंड या कंपनीने अ‍ॅम्बी व्हॅलीमध्ये 10 हजार 700 कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दर्शवली होती. अ‍ॅम्बी व्हॅलीचे बाजारमूल्य 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, असे सहारा समुहाचे मत आहे. त्यामुळे आता अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशी आहे अ‍ॅम्बी व्हॅली
मुंबई-पुणेदरम्यान लोणावळ्याजवळ 67 हजार 621 एकर जागेवर वसविण्यात आली आहे अ‍ॅम्बी व्हॅली. सिनेस्टार, खेळाडू, व्हीआयपींचे बंगले, सुसज्ज कॉटेजवॉटर स्पोर्टस, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस, खासगी रनवे, मोठी हॉटेल्स या व्हॅलीमध्ये आहेत.

सहारा प्रकरण
– सहारा रिअल इस्टेट आणि हौसिंग या दोन कंपन्यांत सेबीच्या परवानगीशिवाय 3 हजार कोटी गुंतवणूकदारांनी 25 हजार कोटींची गुंतवणूक
– 15 टक्के व्याजाने 24 हजार कोटी परत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते
– खोटे गुंतवणूकदार दाखवून पैसा उभा केल्याचा सहारावर आरोप
– सेबीने सहारा रिअल इस्टेट, हौसिंग या कंपन्यांची संपत्ती जप्त केली
– सेबीने 3 कोटी गुंतवणूकदारांची यादी देण्याचे आदेश दिले, मात्र मुदत उलटूनही सहाराने यादी दिली नाही
– सर्वोच्च न्यायालयाने 2012 मध्ये पहिल्यांदा सहारा समुहाला गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. सेबी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरदेखील सहारा समुहाने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाहीत
– त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना न्यायालयात हजर राहाण्यास सांगितले होते. त्यालाही रॉय यांनी टाळाटाळ केली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत लखनऊ पोलिसांनी सुब्रतो रॉयना दिल्लीत आणून न्यायालयासमोर सादर केले.
– न्यायालयाकडून त्यांना दहा हजार कोटी रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु, ते त्याची पूर्तता करू शकले नाहीत, ज्यानंतर त्यांना जामीन मिळाला नाही