अ‍ॅसिड प्यायलेल्या महिलेला मिळाले जीवदान

0

पुणे । एका 45 वर्षीय महिलेने घरगुती वादातून अ‍ॅसिड प्यायल्यामुळे, अन्ननलिकेला व जठराला झालेल्या इजेमुळे तिला पाणी पिणेही शक्य होत नव्हते. सततच्या उलट्या व पोटदुखण्याचा त्रास चालू होता वजन पूर्वीपेक्षा 10 किलो कमी झाले. अशा अवस्थेमध्ये रुग्णाने ससून सर्वोपचार रुग्णालयातील मेडिसिन विभागामध्ये नवीनच अद्ययावत झालेला गॅस्ट्रो इंटरलॉजी विभागात सल्ला घेतला. प्राथमिक चाचणीनंतर रुग्णाचा तोंडावाटे दुर्बिणीतून तपास करण्यात आला.

माफक खर्चात हे उपचार यशस्वी
सुरुवातीला बलूनने जठराचा निमुळता भाग मोठा करण्याचा प्रयत्न केला पण जठराचा निमुळता भाग बराच मोठा असल्याने या प्रयत्नात यश आले नाही. नंतर जठराच्या निमुळत्या भागामध्ये स्टेन्ट टाकण्यात आले. दोन दिवसानंतर तोंडावाटे दुर्बिणीतून तपासणी केली असता निमुळता भाग बर्‍यापैकी मोठा झाला होता. पाणीही न पिता येण्याजोगी रुग्णाची परिस्थिती उपचारापूर्वीं होती, आता रुग्ण व्यवस्थित जेवण करीत आहे. या उपचार पद्धतीमुळे रुग्णाची मोठी शस्त्रक्रिया टळली. ससून रुग्णालयामध्ये अशा प्रकारची उपचारपद्धती वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. अत्यंत माफक खर्चात हे उपचार यशस्वी झाले. अशा प्रकारची उपचारपद्धती ठराविक रुग्णालयातच उपलब्ध आहे.

अ‍ॅसिडच्या इजेमुळे जठर खूप लहान झाले होते. त्यास जखमाही झाल्या होत्या. जठराकडून छोट्या आतड्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. गॅस्ट्रो इंटरलॉजी विभागातील डॉ. विनय थोरात, डॉ. सुनील पवार, डॉ. नागनाथ रेडेवाड व भूलतज्ञ डॉ. गायत्री तडवलकर यांनी रुग्णासोबत सविस्तर चर्चा व समुपदेशन केले. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले व मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. शशिकला सांगळे यांचे मार्गदर्शन मिळाले व रुग्णावर उपचार सुरू झाले.