अ‍ॅसिड हल्ल्यामुळे तमिमचा काउंटी क्रिकेटला बाय बाय

0

लंडन । केवळ नशिब बलवत्तर असल्यामुळे अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेलला बांगलादेशचा स्टार फलंदाज तमीम इक्बाल याने इंग्लंडमधील एसेक्स काउंटी क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणार्‍या या डाव्या हाताच्या शैलीदार खेळाडूने इंग्लंडमध्ये स्वतः आणि कुटुंबियांवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. बांगलादेशच्या डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, तमीम इक्बाल हा त्याची पत्नी आयशा आणि एक वर्षाच्या मुलीसोबत एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना ही घटना घडली.आयशाने हिजाब परिधान केला होता. हे तिघेजण हॉटेलमधून बाहेर पडल्यावर काही जणांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकले.

या घटनेनंतर बांगलादेशकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणार्‍या 28 वर्षीय तमीम इक्बालने तात्काळ एसेक्स काउंटी क्लब सोडण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर तमीमने धसका घेतला होता. त्यामुळे लागलीच त्याने काउंटी चॅम्पियनशीपमधून माघार घेतली असे डेली स्टारने म्हटले आहे. एसेक्स संघाकडून तमीम केवळ एकमेव सामना केंट संघाविरोधात खेळला होता. रविवारी झालेल्या या सामन्यात त्याच्या संघाला 7 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. तमीमने काही खासगी कारणांमुळे क्लब सोडण्याचा निर्णय घेतल्याचं एसेक्स क्लबकडून सांगण्यात आलं आहे.