अ.भा.कामगार महासंघ अध्यक्षपदी पाठक तर उपाध्यक्षपदी राजेंद्र झा यांची वर्णी

0

मुंबईतील अधिवेशनात पदाधिकार्‍यांची निवड ; कर्मचारी रस्त्यावर उतरणार

भुसावळ- अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाचे 26 वे अधिवेशन अ‍ॅन्टोप हिल, मुंबईत नुकतेच झाले. या अधिवेशनात पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी कॉ.एस.एन.पाठक (जबलपूर), महासचिव कॉ.सी.कुमार (चेन्नई), उपाध्यक्ष कॉ.राजेंद्र झा (भुसावळ), सहसचिव कॉ.रवींद्र रेड्डी (पुणे) यांची बहुमताने निवड करण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकारच्या भूमिकेविरुद्ध कर्मचारी संपावर उतरणार असून त्या दृष्टीने अधिवेशनात चर्चा करण्यात आली.

सरकारच्या भूमिकेचा विरोध
अधिवेशनात संरक्षण खात्यातील संकटपूर्ण वर्तमान स्थिती, नॉन कोअर, मेक ईन इंडिया, एफडीआयच्या माध्यमातून ऑर्डनन्स फॅक्टरी ईएमई वर्कशॉप, डीआरडीओ, एमईएस सारख्या संरक्षणामध्ये प्रमुख भूमिका निभावणार्‍या संस्था बंद करण्याचा दिशेने सरकारची भूमिका असल्याचा निषेध करण्यात आला तर 23 ते 25 जानेवारी संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. देशभरातील सुमारे 500 प्रतिनिधी प्रसंगी उपस्थित होते. भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष दीपक भिडे, महासचिव दिनेश राजगिरे, आशिष मोरे, महेंद्र पाटील, प्रवीण पाटील, विनोद धाडे यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.