नाट्य चळवळ टिकविण्यासाठी परिषदेऐवजी इतरांचे परिश्रम
चिन्मय जगताप, जळगाव: गेल्या दोन वर्षापासून काही अभिवाचन सोडल्यास नाट्य परिषदेने ठोस असे काहीही केलेले नाही. कोरोना नंतरसुद्धा नाट्य चळवळ उभी करण्यासाठी शहरातील कॉलेज आणि काही स्वायत्त संस्था आपल्या परीने नाटक वाढावे नाटक रुजाव यासाठी खारीचा वाटा उचलत आहेत. पण नाट्य परिषदेतर्फे ठोस असे काहीही केले जात नाही. यासाठी नागरिक, नाट्यरसिक व नाट्य कलवंत परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद परिषदेची जळगाव शाखा नक्की करतीये तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनता व जळगावातील नाट्यकलावंत विचारत आहेत.
अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी शाखा उभारण्यात आल्या. नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि रसिकांना नाटक पाहता यावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन याशाखाचे जाळे विणण्यात आले. गेल्या महिनाभरापासून नाट्य परिषदेच्या विविध शाखा महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी काहीना काही प्रयोग करत आहेत. ज्यातून नाट्य कलावंतांना प्रोत्साहन मिळत आहे. याचबरोबर रसिकांनाही नाटकाचा आस्वाद घेता येत आहे. पण जळगावची नाट्य परिषदेची शाखा त्याला अपवाद ठरली आहे. उपक्रम राबविण्याचे सोडाच पण येत्त्या काळात शाखेचा कोणताही कार्यक्रमही ठरलेला नाही. कोरोनानंतर तरुण नाट्यकलावंताना गरज आहे. ती म्हणजे प्रोत्साहनाची गरज आहे. पण ते प्रोत्साहन द्यायला नाट्य परिषद कमी पडत आहे.
मू.जे.कॉलेज महोत्सवाच्या तयारीत
मुळजी जेठा महाविद्यालय येत्या मार्च महिन्यापर्यंत नाट्य महोत्सव घेण्याच्या तयारीत आहे. 2019 साली राज्य नाट्य स्पर्धेत जळगावात दुसरे आलेल्या
इस्टमन-कलर या नाटका बरोबरच योगेश सोमण लिखित ‘दृष्टी‘ या एकांकीकेचा आणि मनोज पाटील लिखित वाघमार्या जानकीराम या दोन एकांकिकेचे प्रयोग महोत्सवात होणार आहेत. जळगावच्या नाट्य रसिकांसाठी ही मेजवानी ठरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रम खोळंबले होते. मात्र अशातच आता नाट्य रसिकांसाठी ही मेजवाणी मिळणार असल्याने नाट्य रसिकांच्या आनंदात भर पडणार असल्याचे अनेकांनी सांगितले.
‘नटसम्राट’ येतंय भेटीला
खान्देश नाट्य प्रतिष्ठानतर्फे नुकतेच मराठी रंगभूमीच्या इतिहासात सोनेरी अक्षरात लिहिल्या जाणार्या ‘नटसम्राट’ या जग प्रसिद्ध नाटकाचे अभिवाचन पार पडले. येत्या काळात खान्देश नाट्य प्रतिष्ठान प्रेक्षकांसाठी हेच नाटक घेऊन येत आहेत. हे नाटक रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
नूतन मराठा कॉलेजही सज्ज
गेल्यावर्षी नोव्हेबर महिन्यात नूतन मराठा कॉलेजमध्ये नाट्यशास्त्र विभागात नितीन चंदनशिवे लिखित ‘लक्षी’ या लघुकथेचे नाट्य सादरीकरण झाले.सध्या ‘झपाटलेली चाळ’ ही एकांकिका बसवण्याचे काम वेगात सुरु आहे. 2019 मध्ये ‘हलगी सम्राट’ या एकांकिकेला मिळालेल्या घवघवीत यशामुळे ‘झपाटलेली चाळ’ या एकांकीकेवरील अपेक्षा वाढली आहे. याचबरोबर नुकतेच विद्यालयामध्ये तरुण कलाकारांसाठी एका फिल्म ऑडिशनचे आयोजन केले होते.
भुसावळमध्येही होणार महोत्सव
भुसावळ येथील उत्कर्ष कलाविष्कार यांच्यातर्फे अनिल कोष्टी लिखित आणि धनश्री जोशी दिग्दर्शित ‘लॉक-अनलॉक’ एकांकिकेचे व ‘पिकनिक’ या दीर्घांकाचे प्रयोग ताप्ती पब्लिक स्कूल येथे झाले. यापुढे ‘लॉक-अनलॉक’ एकांकिकेचे प्रयोग होणार आहे. एक 2 अंकी नाटक बसविण्याचे काम सुरू आहे.
‘परिवर्तन’ पुण्यात वाजवतोय जळगावचा डंका ‘परिवर्तन’
जळगाव ही शहरातील एकमेव नाट्य संस्था आहे. जिने 2020 मध्येही जोरदार प्रयोग केले आहेत. अभिवाचन, थिएटरचे ऑनलाईन प्रयोग सुद्धा ‘परिवर्तन’मार्फत केले गेले. सध्या पुण्यात सुरू असलेल्या ‘परिवर्तन’च्या कला महोत्सवाला मोठी दाद मिळत आहे. त्यांच्यामुळे जळगावचा डंका पुण्यातही वाजत आहे.