राज्यपालांचा दौरा रद्द; पत्रकार परिषदेत माहिती
चाळीसगाव – अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचे तीन दिवसीय अधिवेशन येथे २२ ते २४ दरम्यान होत असून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी आठ वाजता पाटणादेवी मंदिरात उदघाटन होणार होते मात्र त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला असून अणू शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल तर अध्यक्षस्थानी उमविचे माजी कुलगुरु व गणितज्ञ प्रा. एन.के.ठाकरे तर स्वागताध्यक्ष आमदार उन्मेष पाटील असतील. तीन दिवसीय संमेलनात विविध परिसंवादांसह, व्याख्यान, विज्ञान सहल, वैज्ञानिक गप्पा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
अधिवेशनात शास्त्रज्ञ, अभ्यासक यांच्या उपस्थितीत होणारे अधिवेशन दुसऱ्यांदा चाळीसगावात होत असून त्याला विद्यान प्रेमी पालक विद्यार्थी, अभ्यासकांनी मोठी उपस्थिती द्यावी अशी विनंती आज पत्रकार परिषदेत मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ बाळासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. भडगांव रोड येथील वाणी समाज मंगल कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष प्रा.अनिल बागड, कार्यवाह डी.टी.पाटील, कोषाध्यक्ष सी.सी.वाणी, अभय यावलकर, प्रा.सलील कुमारी मुथाणे, प्रा.ल.वी.पाठक, सुधिर पाटील, सुशांत जगताप, प्रदीप पुराणिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.