किनगावसह गिरडगाव गावात शोककळा
भुसावळ- नोकरीनिमित्ताने खान्देशातून गुजराथमध्ये गेलेल्या तिघा मित्रांचा रंगपंचमीच्या दिवशीच आंघोळीसाठी गेल्यानंतर नदीत बुडाल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर यावल तालुक्यातील किनगावसह गिरडगाव येथे शोककळा पसरली आहे.
समजलेल्या माहितीनुसार तीनही जण सुटीनिमित्ताने गुजराथमधील मांडवी बोधाना येथे पर्यटनासाठी गेल्यानंतर शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनेत श्रीराम संतोष पाटील (22) तर गिरडगाव येथील डिगंबर पुंडलिक पाटील (21) व शशीकांत मोतीराम पाटील (25) यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेची वार्ता शुक्रवारी सायंकाळी दोन्ही गावांमध्ये पोहोचल्यावर शोककळा पसरली. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दोन्ही ठिकाणचे नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले आहेत. किनगावच्या श्रीराम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिणी असा परीवार आहे.