आंचळगाव येथे विशेष बाब म्हणून नवीन आरोग्य उपकेंद्राला मंजुरी

0

भडगाव – आरोग्य सेवा संचालनालय यांच्या वतीने २५ सप्टेंबर 2018 रोजी तालुक्यातील आंचळगाव येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हे उपकेंद्र होण्यासाठी भडगाव तालुका समनव्य समितीचे अध्यक्ष डॉ संजीव पाटील यांनी गावाला शब्द दिला होता. त्यासाठी त्यांनी सातत्याने मुंबई येथे जाऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री ना गिरीष महाजन व खासदार ए टी पाटील यांच्या सहकार्याने मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना दि. २६ नोव्हेंबर रोजी यश आले व याबाबत शासन निर्णय अध्यादेश काढण्यात आला असून विषेश बाब म्हणून या उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली आहे.

या उपकेंद्राला लवकर मंजूरी मिळावी यासाठी मागील महिन्यातच समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव पाटील, तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, माजी जि.प.सभापती एकनाथ महाजन व दीपक पाटील आदींनी मुंबई येथे याबाबत संबंधित विभागाची व अधिकारी मंडळींची भेट घेतली होती. आंचळगाव येथील नागरिकांना आरोग्यासाठी दुसऱ्या मोठ्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा लागत होते. मात्र या ठिकाणी उपकेंद्र स्थापन झाल्यास व प्रशस्त बांधकाम झाल्यास येथे चांगल्या पद्धतीने उपचार केला जाणार आहे. काल आंचळगाव आरोग्य उपकेंद्रेला मंजुरी मिळाल्याने या भागातील लोकांनी एकच जल्लोष केला. शिवाय यासाठी परिश्रम घेणारे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री ना गिरीश महाजन, खासदार ए.टी.पाटील व डॉ.संजीव पाटील यांचे विशेष आभार मानले. लवकरच या कामाला दीड कोटींच्या जवळपास निधी मिळणार असल्याची माहितीही डॉ. संजीव पाटील यांनी दिली.