आंतरजातीय विवाहाला विरोध करीत पती-पत्नीसह कुटुंबियास मारहाण

0

भुसावळातील घटना ; 9 संशयीतांना न्यायालयाने सुनावली एक दिवसाची कोठडी

भुसावळ- मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येवून तिच्यासह पती, सासु-सासर्‍यांना मारहाण करणार्‍या 13 संशयीतांविरुद्ध बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत रविवारी अटक केली होती. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जामनेर रोडवरील कृष्णा नगर भागातील रहिवासी असलेल्या मोना नितीन कांडेलकर या युवतीने घरच्यांच्या इच्छेविरूध्द आंतरजातीय विवाह केल्यानंतर तिच्यासह पती व दीर व सासुला आरोपींनी 19 रोजी दुपारी एक वाजता मारहाण केली. तक्रारदार तरुणीने कृष्णा नगरातील रहिवासी असलेल्या नितीन मधुकर कांडेलकर यांच्याशी 21 ऑक्टोबर 2018 रोजी भुसावळ न्यायालयात रजिस्टर पद्धत्तीने विवाह केल्याने ती पतीसोबत बाहेरगावी राहत होती शिवाय ती आठ महिन्यांची गर्भवतीदेखील असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आंतरजातीय विवाह केल्याने मारहाण
या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तरुणीच्या फिर्यादीनुसार नवलसिंग मंजुसिंग भाडिया (रा.हरदा, मध्यप्रदेश), दीपसिंग तेजसिंग बावरा, बाबुसिंग दीपसिंग बावरा, प्रतापसिंग दरबारसिंग बाटीया, मंगलसिंग चंदासिंग छाबडा, अवतारसिंग दर्शनसिंग बाटीया, चंदनकौर मंगलहसिंग छाबडा, छायाकौर प्रधानसिंग बावरा, कुलजितसिंग मंगलसिंग बावरा, मोनुसिंग दीपसिंग बावरा, जतेसिंग गुमानसिंग बावरा, प्रधानसिंग चंदनसिंग बावरा व बलजितसिंग बावरा (सर्व रा. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 19 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरी जाऊन तीला शिवीगाळ व मारहाण केली. ती गर्भवती असतांनाही तीच्या पोटात लाथ मारण्यात आली तर माहिती पती नितीन कांडेलकर व दीर व सासू यांना मिळताच ते घरी आल्यानंतर आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. दरम्यान, या गुन्ह्यातील नऊ आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका खैरनार या करीत आहेत.