आंतरजातीय विवाह करणार्‍यांना वाळीत टाकले

0

पुणे । जातीबाह्य विवाह करणार्‍या युवकांना जातीतून बहिष्कृत केल्याप्रकरणी पुण्यातील तेलगु मडेलवार समाजाच्या पंचाविरोधात खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अजित रामचंद्र चिंचणे, महेश तुलसीराम अंगारे आणि संतोष राजाराम चिंचणे या युवकांनी फिर्याद दिली आहे.

तेलगु मडेलवार समाजातील काही युवकांनी आंतरजातीय विवाह केल्यामुळे या जातीतील काही पंचानी या युवकांना शिक्षा म्हणून वाळीत टाकले आहे. ही पंचमंडळी आंतरजातीय विवाहाला विरोध करत अशाप्रकारे लग्न करणार्‍यांच्या लग्नात ही मंडळी स्वतःही जात नाहीत. अन्य कोणी जात असतील त्यांना आडकाठी करतात. वारंवार विनंती करूनही त्यांना वाळीत टाकण्यात आले होते. अखेरीस या युवकांनी कंटाळून पंचाविरोधात पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.