मुंबई । विवाह सोहळ्याचा खर्च सामान्यांना गरिबांना कर्ज काढून करावा लागतो अशावेळी सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम श्रेष्ठ ठरत असून, यापुढे सामाजिक संस्थांनी जातीभेद मिटवण्यासाठी उपयुक्त ठरणारे आंतरजातीय सामुदायिक विवाह सोहळेसुद्धा आयोजित करावेत, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते दादरमध्ये राजा शिवाजी विद्यालय येथील प्रांगणात आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात बोलत होते.
धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय आणि सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात रामदास आठवलेंनी मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी आंतरजातीय विवाहाचे महत्त्व सांगताना समाज एकतेसाठी याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी विचारमंचावर उद्योगमंत्री सुभाष देसाई, पद्मश्री सुमा घोष, आमदार कालिदास कोळंबकर, धर्मादाय सहआयुक्त सुनीता तराड, धर्मादाय उपायुक्त सुवर्णा खंडेलवाल जोशी, आयोजक कारखानीस, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, माजी आमदार विनोद घोसाळकर, जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, बाबा काळे, सचिनभाई मोहिते, हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.