आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत 171 शिक्षकांचे जळगाव जिल्ह्यात ‘इनकमिंग’

0

जळगाव । प्राथमिक शिक्षण विभागाकडून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी पार पडलेल्या प्रशासकीय कार्यवाहीत बाहेरील जिल्ह्यातून 171 शिक्षक बदली होऊन जिल्ह्यात दाखल झाले. तर जळगाव जिल्ह्यातील 122 शिक्षक बदली होऊन दुसर्‍या जिल्ह्यात गेले. जळगाव जिल्ह्यात उर्दू माध्यमासाठी 100 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. परंतु, दुसर्‍या जिल्ह्यातील एकही शिक्षकाचा प्रस्ताव प्राप्त झाला नाही. तसेच जिल्ह्यातील एकही शिक्षक दुसर्‍या जिल्ह्यात बदली होऊन गेला नाही, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी दिली.

…तरीही 150 ते 200 पदे रिक्त राहणार
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी बाहेरील जिल्ह्यातून तब्बल 171 शिक्षक बदली होऊन जिल्ह्यात दाखल झाले. बदली होऊन आलेल्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात अजून 150 ते 200 शिक्षकांची पदे रिक्त राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिक्षण विभागाची डोकेदुखी कायम राहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शिक्षक बदली प्रक्रिया आता थेट मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीने हाताळली जात असल्याने या प्रक्रियेतील गोंधळ दूर झाला असून बदली प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडत आहे.

पदस्थापनाही ऑनलाईनच
बदली प्रक्रियेत बदली झालेले व बदलून आलेल्या शिक्षकांना त्या-त्या जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीनेच पदस्थापना दिली जाणार आहे. पदस्थापनेबाबत अद्याप कोणतीही माहिती किंवा सूचना मंत्रालयस्तरावरून शिक्षण विभागाला देण्यात आलेल्या नाहीत, असेही प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी सांगितले.

‘अनमॅपिंग’चे काम सुरू
बदली प्रक्रियेत जे शिक्षक बदली होऊन दुसर्‍या जिल्ह्यात गेले आहेत; त्यांची नावे बदलीच्या यादीतून वगळण्यासाठी ‘अनमॅपिंग’चे कामदेखील तात्काळ सुरू करण्यात आले आहे. अनमॅपिंग आणि बदली प्रक्रियेचे काम एकाचवेळी सुरू असल्याने मंगळवारी जि.प.तील सर्वशिक्षा अभियान विभागात शिक्षकांची तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, जे शिक्षक बदली होऊन दुसर्‍या जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात आले आहेत; त्यांच्या याद्या तालुकानिहाय गटशिक्षणाधिकार्‍यांकडे जाणार आहेत. मंत्रालयातून पदस्थापनेबाबत सूचना आल्यानंतर त्यांना सामावून घेतले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात बदलून गेलेल्या शिक्षकांना वरिष्ठ कार्यालयातून आदेश आल्यानंतर कार्यमुक्त केले जाणार आहे.