आंतरराज्यीय एटीएम चोर जाळ्यात

0

एमपीसह महाराष्ट्र व छत्तीसगढमध्ये केल्या चोर्‍या; जिल्ह्यातील चोर्‍या उघड होणार

भुसावळ (गणेश वाघ)– भुसावळसह किनगाव व धानोर्‍यातील एटीएम फोडून जिल्हा पोलीस प्रशासनाची झोप उडवणार्‍या चोरट्यांनी सर्वप्रथम नागपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालून जळगावनंतर बडोद्यात उच्छाद मांडला होता. चोरट्यांनी यानंतर आपला मोर्चा मध्यप्रदेशातील छिंदवाडाकडे वळवला व चोरीही केली मात्र सायबर सेलच्या आधारे गुप्त माहितीनुसार छिंदवाडा पोलिसांनी सहा आरोपींच्या नागपुरातून मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपींनी मध्यप्रदेशसह महाराष्ट्र व छत्तीसगढमध्ये चोरी केल्याची माहिती पोलीस प्रशासनाला दिल्याची माहिती आहे. चोरट्यांची ही आंतराज्यीय टोळी असून त्यांच्यातील अन्य चार जण पसार झाले असून त्यांचा पोलीस प्रशासनाकडून कसून शोध सुरू आहे. आंतरराज्यीय टोळी जाळ्यात अडकल्याने जळगाव जिल्ह्यात झालेल्या चोर्‍यांची उकल होण्याची दाट शक्यता आहे. गुरुवारी वा शुक्रवारी जळगाव गुन्हे शाखेचे पथक छिंदवाड्यात जावून माहिती घेणार आहे. आरोपींना 12 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आधी नागपूर, नंतर जळगाव व्हाया बडोदा व एमपी प्रवास
नागपूरमधील हिंगणा तालुक्यातील डोंगरगावच्या गुमगाव मार्गावरील बँक ऑफ इंडियाचे दोन एटीएम फोडून तब्बल 19 लाख 73 हजार 400 रुपयांची रोकडही लांबवली. त्यानंतर शुक्रवार, 12 जानेवारीला चोरी केल्यानंतर चोरट्यांनी रविवार, 14 रोजी मध्यरात्री भुसावळातील अ‍ॅक्सीसचे एटीएम फोडून तीन लाख 14 हजार 100 रुपये तर किनगावातील टाटा इंडिकॅशमधून 75 हजार तसेच धानोर्‍यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून तीन लाख 63 हजार 100 रुपये उडवत चोरीच्या वाहनाद्वारे बडोदा गाठले होते. बडोद्यातही अजवा रोडवरील एसबीआयच्या एटीएममधून चोरट्यांनी 13.88 लाख तर थारसली क्षेत्रातील एटीएममधून 94 हजारांची रोकड लांबवली होती.

सर्व आरोपी मास्टरमाईंड
छिंदवाडा पोलीस अधीक्षक गौरव तिवारी यांच्या माहितीनुसार सर्वच आरोपी कुविख्यात व गुन्हा करण्यात तरबेज आहेत. आतापर्यंत देवराव वर्मा (बिछुआ, डोंगरगांव), अशोक सदाशिव बडबुदे (36, बिसापूर, मोहखेड), अक्षय उर्फ केके अशोक कुकडे (21, बेला, भंडारा), रवि रामप्रसाद दुबे (30, बेला, भंडारा), रमेश उर्फ रोजगारी गोकुल ठाकुर (30, मैनापिपरीया, जि.सिवनी) सेवकराम सहसराव उईके (30, भारती पिपरीया) यांना अटक झाली. मारोती व बोलेरो वाहन, तीन लाखांची रोकड, गॅस सिलिंडर जप्त झाले आहे.