आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूच टॉपवर !

0

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटपटूंचीच चलती पाहायला मिळते. भारताच्या खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. आयसीसीने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये फलंदाजीच्या क्रमावारीत भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर विराजमान आहे.

कोहलीने दुबईमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत विश्रांती घेतली होती. तरीही त्याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा आहे. या यादीमध्ये भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवननेही आठवे स्थान पटकावले आहे.

गोलंदाजी क्रमवारीतही भारतीय खेळाडूंनीच दमदार मजल मारल्याचे समोर आले आहे. या क्रमवारीत अव्वल स्थानावर भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा विराजमान आहे. त्याचबरोबर भारताचे दोन युवा फिरकीपटू अव्वल पाच गोलंदाजांमध्ये आहेत. कुलदीप यादवने या क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले आहे, तर युजवेंद्र चहल हा पाचव्या स्थानावर आहे.