हडपसर । शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना, नागरिकांचे राहणीमान देखील बदलत आहे. यामुळे केवळ धार्मिक विधांसाठी असणारे महत्त्व आता उच्च जीवनशैलीत वाढत आहे. परिणामी फुलांची बाजारपेठ देखील विस्तारत आहे. पुणे बाजार समितीमधील भविष्यातील फुलांची उलाढाल 500 कोटींपर्यंत वाढणार असल्याने, त्यासाठी बाजार समिती 100 कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे फूल मार्केट उभारत आहे. राष्ट्रीय पुष्पसंशोधन संस्था देखील मांजरी येथे असून, ही संस्था आणि नवीन फूल बाजार शेतकर्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. म्हणून शेतकर्यांनी संशोधन संस्थेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या नवनवीन फुलांच्या वाणांचे उत्पादन घ्यावे. असे आवाहन पुणे बाजार समितीचे उपमुख्यप्रशासक भूषण तुपे यांनी केले.
राष्ट्रीय पुष्पसंशोधन संस्थेच्या वतीने मांजरी येथील जागेवर आयोजित ‘शेवंती आठवड्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात तुपे बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. के.व्ही. प्रसाद, बारामती केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकिरअली, नारायणगाव केव्हीकेचे बी.जी. टेमकर आदी उपस्थित होते.
डॉ. प्रसाद म्हणाले, शेतकर्यांनी पांरपरिक भाजीपाला पिकांपेक्षा फूल उत्पादनांकडे वळण्याची गरज आहे. केवळ भाजीपाला उत्पादनावर अवलंबून न राहता फूल शेती आणि प्रक्रियेतून वेगळे व्यवसाय करण्याची गरज आहे. बाजारभाव पडल्याने फुले फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर येते. हा होणारा तोटा कमी करण्यासाठी पुणे बाजार समितीच्या वतीने एकात्मिक प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. डॉ. सय्यद शाकिर अली म्हणालेे, विक्रमी उत्पादनामुळे भाजीपाल्याचे दर पडतात, तर कधी फेकून द्यावे लागता. शेतकर्यांनी फुलांचे विविध वाण शेतीसाठी संधी असून शेतकर्यांनी पारंपरिक भाजीपाला शेतीशिवाय फूल शेतीकडे वळले पाहिजे. ही काळाची गरज ठरणार आहे.